वाई : शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी विविध चौकात व मुख्य रस्त्यावर वॉच ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, सध्या ही यंत्रणा बंद पडल्याच्या स्थितीत आहे. सण, उत्सवांच्या काळात यंत्रणा सुरू राहणे आवश्यकआहे. तर सध्या या सीसीटीव्हीच्या देखभाल, दुरुस्तीसाठी पालिका प्रशासनाकडे पत्र व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
सुमारे तीन वर्षांपूर्वी विविध सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजकांनी शहरातील गुन्हेगारीला जरब बसून त्यांच्यावर वॉच ठेवण्यासाठी एकूण १६ ठिाकणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. येथील विविध चौक, मोक्याच्या रस्त्यावर हे कॅमेरे बसविण्यात आले होते़
यामध्ये किसन वीर चौक, महागणपती चौक, चित्रा टॉकीज, शाहीर चौक, गंगापूरी, भाजी मंडई, नगरपालिका परिसर, चावडी चौक, वाई बसस्थानक, सह्याद्रीनगर स्टॉप यासह विविध महत्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले होते़ यामुळे गुन्हे उघड होण्यासही मदत होत होती. त्यामुळे गुन्हगारांना जरब बसत होती़ परंतू, अलीकडील काही महिन्यांपासून संपूर्ण शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली आहे़ याचे कसलेही सोयरसूतक संबंधीत यंत्रणांना नाही़
सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी सामाजिक भावनेतून दिलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेची साधी देखभालही संबंधीत यंत्रणा ठेऊ शकत नाही, याबद्दल नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. याची जबाबदारी असणाºया यंत्रणेला प्रशासनाकडून देखभाल खर्च न दिल्यामुळे ही यंत्रणा बंद पडली आहे, अशी माहिती देण्यात येत आहे़ : सध्या सण, उत्सवांचा काळ आहे. यामध्ये दहीहंडी, स्वातंत्र्यदिन, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव हे सण आहेत. या सणांच्या दरम्यान, सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणेची नितांत गरज असते. गणेशोत्सव काळात मंडळांच्या सजावटी पाहण्यासाठी वाई शहर व परिसरातून मोठ्या प्रमाणात लोक येतात. अशावेळी गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गैरफायदा घेण्याची शक्यता जास्त असते़ अशा परस्थितीत सीसीटीव्हीची मदत महत्वाची ठरते़ गुन्हेगारांना आळा बसविण्यास मदत होत असते़ सध्या सीसीटीव्ही यंत्रणा विस्कळीत झाल्याने नागरिकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे़ सणांच्या पार्श्वभूमिवर सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णपणे सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे़ वाई शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा सुरू रहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नगरपालिकेकडे देखभाल व दुरुस्तीसाठी पत्रव्यवहार केला आहे. सीसीटीव्ही दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.- विनायक वेताळ,पोलिस निरीक्षक वाई