कुडाळ : ‘जावळीचा नावलौकिक व्हावा, आपली माणसं वाढावीत म्हणून एकत्र राहिलो. काही लोकांना माझी राजकीय अडसर वाटू लागली. याकरिता जिल्ह्यात आता जावळीची ओळख पुन्हा एकदा निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागणार आहे. आम्ही जरी राजे नसलो तरी, आम्ही जनतेच्या मनातील राजे आहोत. जावळीतील कष्टकरी जनता ही आमच्यासोबत असून, नक्कीच बदल घडणार आहे,’ असे प्रतिपादन आमदार शशिकांत शिंदे यांनी केले.
मोरघर (ता. जावळी) येथे ग्रामपंचायत मोरघर यांच्या माध्यमातून होत असलेल्या विकास कामांचे भूमिपूजन व घाटाईदेवी व बाळूमामा यांची मूर्तिप्रतिष्ठापना याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, माजी शिक्षण सभापती अमित कदम, माथाडीचे नेते सुरेश गायकवाड, प्रतापगड कारखान्याचे संचालक भानुदास गायकवाड, सरपंच रंजना मोरे, उपसरपंच आशालता गायकवाड, तसेच मोरघर व मोरखिंड येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
आमदार शिंदे म्हणाले, ‘जावळीमध्ये झालेल्या माझ्या एका पराभवाने काहीजण मला संपविण्याची भाषा करू लागले आहेत. जिल्हा आपल्या हातात राहावा, अशी त्यांची मानसिकता आहे. मीच काहींना मोठे केले, त्यांनी निश्चितच मोठे व्हावे. मात्र, यात आपण एक दिवस संपणार नाही, याची काळजी घ्यावी. पुढील काळात जावळी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहणार आहे. याकरिता जबाबदारी घेतलेली आहे.’
यावेळी अमित कदम, दीपक पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी नीलेश गायकवाड, दत्ता गायकवाड, अमर गायकवाड, तसेच ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी प्रयत्न केले. चंद्रकांत गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. संतोष गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. संजय मोरे यांनी आभार मानले.