कऱ्हाड : विद्यार्थी ‘स्कूल बॅग’ घेऊन शाळेला जाताना आपण दररोज पाहतोय; पण हो, सध्या कऱ्हाड-पाटण तालुक्यांच्या प्राथमिक शिक्षकांच्या पाठीवर ही स्कूल बॅग दिसतेय अन् ‘कपबशी’तून चहा पिताना त्यांचा मतांच्या गणिताचा अभ्यास चाललेला दिसतोय !कऱ्हाड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटीची निवडणूक ४ एप्रिल रोजी होऊ घातलीय, त्यासाठी सत्ताधारी गटाचे सद्गुरू शिक्षक संघ पॅनेल, शिक्षक नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक रिंगणात उतरले आहे. तर संघातील माजी आमदार शिवाजीराव पाटील गटाने शिक्षक समितीच्या हातात हात घालून ‘परिवर्तन’ पॅनेल उभे केले आहे.निवडणुकीसाठी सद्गुरू पॅनेलला ‘स्कूल बॅग’, तर परिवर्तन पॅनेलला ‘कपबशी’ हे चिन्ह मिळालंय. मग काय, एरव्ही विद्यार्थ्यांच्या हातात असणारी स्कूल बॅग आता चक्क प्राथमिक शिक्षकांच्याच पाठीवर दिसू लागलीय. गावोगावच्या मतदारांपर्यंत उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते स्कूल बॅग घेऊनच प्रचार करताहेत. अन् शाळेत जाणारी पोरं मास्तरांच्या हातातली स्कूल बॅग बघून अचंबित होत आहे. पण, या बॅगेत नेमकी कोणती वह्या-पुस्तके आहेत, हे त्यांना कळेना झालंय.उन्हाळ्याची तीव्रता वाढली असली तरी अनेक ठिकाणी उमेदवार व कार्यकर्ते प्रचाराला गेल्यावर कपबशीतून चहा देऊनच पाहूणचार होतोय. अंगाची लाहीलाही होत असतानाही प्रत्येकजण ‘कसाबसा’ चहा पितोय; पण चहातला गोडवा मतात कायम राहणार का? हे मात्र कुणालाच समजेना झालंय ! (प्रतिनिधी)
प्रचाराला चाललो आम्ही..!
By admin | Published: April 01, 2015 9:58 PM