कुडाळ : ‘जावळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे डोंगरकपारीत, दऱ्या-खोऱ्यात राहणारा शेतकरी या अस्मानी प्रकोपात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. शेतीवरच उदरनिर्वाह असलेल्या या भागात ओढावलेल्या संकटाने शेतकरी नैराशाच्या गर्तेत अडकला आहे. त्यांना मदतीचा हात देत त्यांचे दुःख समजून घेण्यासाठीच आम्ही आलो आहोत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार व व्यसनमुक्त युवक संघाचे संस्थापक बंडातात्या कराडकर यांनी वाहिटे (ता. जावळी) येथे केले.
यावेळी जावळीचे तहसीलदार राजेंद्र पोळ, मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने, जावळी वारकरी संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण महाराज शिंदे, विजय महाराज शेलार, विलासबाबा जवळ, बजरंग चौधरी, राजेंद्र जाधव, दीपक महाराज, नंदू जगताप तसेच महाराष्ट्रातून आलेले व्यसनमुक्त संघाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
तळीये (ता. महाड), पाटण, वाई भागात डोंगर खाली येऊन काही गावेच उद्ध्वस्त झाली आहेत. यामध्ये जीवितहानीही झाली. जावळी तालुक्यातही बोंडारवाडी ते आंबेघर व केळघर ते वाहिटे-रेंगडी या गावातील शेतकऱ्यांची अपरिमीत हानी झाली असून, संपूर्ण शेतीच उद्ध्वस्त झाली आहे. गावागावातील विहिरी गाडल्या गेल्या आहेत. मोटारी वाहून गेल्या आहेत. डोंगर तुटून खाली आलेले अजस्त्र दगड मशीनलासुध्दा हलेना झालेत. वीज नाही, पिण्याचे पाणी नाही, संपर्कासाठी मोबाईलला रेंज नाही, अशा या डोंगरी भागातील शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बंडातात्या कराडकर व व्यसनमुक्त युवक संघाचे कार्यकर्ते या भागात पोहोचले होते. यावेळी वाहिटे गावातील नुकसानाची पाहणी करून आपद्ग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला.
चौकट:
समाजाने पुढे येऊन मदतीचा हात द्यावा...
बंडातात्या कराडकर हे इथल्या शेतकऱ्यांना धीर देत असतानाच इथली भयानक परिस्थिती पाहून मात्र त्यांच्याच अश्रूंचा बांध फुटला. हे दुःख इतके मोठे आहे की, तुमचे अश्रू कोणीच पुसू शकत नाही; पण तुम्हाला जिद्दीने सावरायलाच हवे व पुन्हा उभे राहायलाच हवे. या भागातील गरीब व गरजू मुलांना राष्ट्रबंधू राजीव दीक्षित गुरुकुलमध्ये मोफत शिक्षण देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारत आहोत. वाहिटे, बाहुळे, भूतेघर व बोंडारवाडी या गावांमध्ये आम्ही मदत दिली असली तरी ती पुरेशी नाही. समाजातील लोकांनी पुढे येऊन या गावांना पुन्हा उभे करण्यासाठी मदतीचा हात द्यावा.
३१ कुडाळ
फोटो: वाहिटे (ता. जावळी) येथील ग्रामस्थांना ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर व व्यसनमुक्त युवक संघाकडून मदतीचा हात देण्यात आला.