डॉ. सुरेश भोसले
प्रमोद सुकरे
कराड : साखरेला सध्या म्हणावे तसा बाजारपेठेत उठाव नाही. परिणामी साखर कारखानदारी अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे गरजेनुसार साखर उत्पादन घेऊन इथेनॉल निर्मितीकडेही भविष्यात लक्ष द्यावे लागेल. काळाची पावले ओळखूनच वाटचाल करावी लागेल, असे मत कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केले.
प्रश्न - सन १९८९ पासून कृष्णा कारखान्याचा सत्ता संघर्ष लोकांनी बघितला आहे. यंदा मात्र आपण ऐतिहासिक विजय मिळवला यामागचे गमक काय?
उत्तर :- सन १९८९ अगोदरचा काळ विश्वासाचा ,स्थिरतेचा होता. ८९ साली जो संघर्ष झाला तो घरातीलच झाला. त्यावेळी लोकांची दिशाभूल केली म्हणून सत्तांतर झाले. सत्य बाहेर यायला उशीर लागतो. आता खऱ्या खोट्यातला फरक लोकांना कळला आहे. त्यामुळेच हा ऐतिहासिक विजय मिळाला. वास्तविक आम्हालाही एवढे मोठे यश मिळेल असे वाटत नव्हते. पण आज जबाबदारी वाढल्याची जाणीव आहे.
प्रश्न - या निवडणुकीला राजकीय रंग देण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला. त्याबाबत काय सांगाल?
उत्तर : सहकारात राजकारण चांगले नाही. ''एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ'' याप्रमाणे सगळ्यांना बरोबर घेऊन येथे जावे लागते. पण ज्यांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला तो सभासदांनीच हाणून पाडला आहे.
प्रश्न - कृष्णा कारखान्याची सध्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे ?
उत्तर :- गत ६ वर्षांत आम्ही १२६ कोटींचे कर्ज फेडले आहे. माल तारण कर्ज सोडले तर इतर कर्ज फारसे नाही. आज जवळजवळ कारखाना कर्जमुक्तच आहे.
प्रश्न - गत पाच वर्षांत आपण कारखान्याच्या हिताचे कोणते निर्णय घेतले, काय योजना राबविल्या त्याचा आपणाला फायदा झाला?
उत्तर : आम्ही कारखान्याचा विस्तार केला. त्याशिवाय चांगला दर देणे शक्यच नाही. बदल करावे लागतात. डिसलरीचे नूतनीकरण व विस्तार केल्याने १ टक्के उतारा वाढला आहे. शिवाय कारखाना पुरस्कृत उपसा जलसिंचन योजनांचे चांगले नियोजन केले. जयवंत कृषी योजनेच्या माध्यमातून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला. अशा कितीतरी बाबी सांगता येतील
प्रश्न - कृष्णा कारखान्यात सभासदाच्या हिताच्या भविष्यामध्ये आपण कोणत्या योजना राबविणार आहात?
उत्तर : - ऊस पीक हे राष्ट्रीय पीक म्हणून ओळखले जाते. ऊस जणू सोन्याची खाणच आहे. त्यामुळे भविष्यात इथेनॉल उत्पादन वाढवावे लागेल. तसेच पाणी सुद्धा राष्ट्रीय संपत्ती आहे. त्यामुळे ऊस शेती करताना पाण्याचे नियोजन करावे लागेल. भविष्यात कृष्णाच्या कार्यक्षेत्रात ठिबक सिंचनचे नियोजन करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. गट शेती करता येईल का? याचाही अभ्यास आम्ही करणार आहोत.
प्रश्न - दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. त्यामुळे सहकाराचे फायदे काही काळ पाहायला मिळाले. आज त्या सहकार चळवळीची नक्की काय अवस्था आहे असे तुम्हाला वाटते?
उत्तर : सहकारामुळे समृद्धी वाढली हे निश्चित आहे, पण त्यातून सत्तास्थान तयार झाले. मग त्यात राजकारण आपोआप आले. आता मागे वळून पाहण्याची, त्यात दुरुस्ती करण्याची व तेथे निस्वार्थी लोक कसे येतील हे पाहण्याची गरज आहे.
प्रश्न - बदलत्या काळात, स्पर्धेच्या युगात सहकाराचे व्यवस्थापन टिकविण्यासाठी काय करायला हवे?
उत्तर : यासाठी प्रबोधन चळवळ अतिशय महत्त्वाची आहे. प्रबोधन झाल्यानंतरच त्याचे व्यवस्थापन नीट होईल.
प्रश्न - गत दहा वर्षांत अनेक सहकारी पतसंस्था, बँका, कारखाने मोडकळीस निघाल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये गोरगरीब भरडला जातोय. याबाबत आपण काय सांगाल?
उत्तर : सहकारी संस्थांना कसे संरक्षण द्यायचे हे आता सरकारनेच ठरवावे लागेल. त्यासाठी काही खास योजना ही राबवाव्या लागतील.
प्रश्न - आजपर्यंत केंद्रात सहकार खाते कार्यरत नव्हते. नुकतेच सहकार खाते सुरू करण्यात आले आहे. त्याचा काय फायदा होईल?
उत्तर : केंद्रात सुरू केलेल्या सहकार खात्याकडे सकारात्मक बघितले पाहिजे असे मला वाटते. त्यांनी याकडे योग्य पद्धतीने लक्ष दिले तर नक्कीच फायदा होईल. आम्हीसुद्धा सहकारी साखर कारखानदारी समोरील अडचणी पत्राद्वारे केंद्रीय सहकार मंत्रालयाकडे पाठविणार आहोत.
फोटो
डाॅ. सुरेश भोसले