लोकमत न्यूज नेटवर्कवाई : ‘शहर विकासासाठी वाई पालिकेने २३ कोटींच्या निधीची मागणी केली आहे. मात्र, पालिकेला प्रस्तावित मागणीपेक्षाही अधिक निधी टप्प्या-टप्प्याने दिला जाईल. यासाठी जून महिन्यात मंत्रालयात स्वतंत्र बैठकीचे आयोजन केले जाईल,’ असे आश्वासन शालेय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी दिले.वाई पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, मुख्याधिकारी प्रसाद काटकर उपस्थित होते. दरम्यान, पालिकेच्या वतीने कृष्णामाईची प्रतिमा व शाल श्रीफळ देऊन मंत्री विनोद तावडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा शिंदे यांनी शहरातील विविध प्रस्तावित विकासकामांसाठी २३ कोटींच्या निधीची मागणी करणारे निवेदन मंत्री विनोद तावडे यांना दिले.पालिकेच्या शाळांच्या अडचणी व सध्या शासनदरबारी पडून असलेल्या हद्दवाडीच्या प्रस्तावाकडे नगराध्यक्षांनी मंत्री तावडे यांचे लक्ष वेधले. तर उपनगराध्यक्ष सावंत यांनी पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेसाठी तत्काळ निधी मंजूर करण्याची मागणी केली. वाईला एक आदर्श शहर म्हणून ओळख देण्यासाठी सर्वप्रथम हद्दवाढ करून पुन्हा नव्याने प्रारूप आराखडा तयार करण्यात यावा यासाठी शासनस्तरावर सहकार्य करण्याची अपेक्षा सावंत यांनी मंत्री तावडे यांच्याकडे व्यक्त केली. यासंदर्भात तावडे यांनी नव्याने प्रारूप आराखडा तयार करण्यापेक्षा आहेत त्याच आराखड्यात दुरुस्त्या केल्या तर तो लवकर मंजूर होईल, असे सांगितले. नगरसेवक दीपक ओसवाल यांनी शहरातील वाहतूक समस्येकडे तावडे यांचे लक्ष वेधत दोन नवीन पुलांच्या मंजुरीची मागणी केली. निवेदनातील सर्व विषयांच्या अनुषंगाने बोलताना मंत्री तावडे म्हणाले, ‘ग्रामीण रुग्णालयातील पदे भरण्यापासून ते नवीन पूल, सुधारीत प्रारूप आराखडा हे सर्व विषय नगरविकास खात्यातंर्गत असून, हे खातं मुख्यमंत्र्यांकडे आहे. आपण दिलेल्या निवेदनातील सर्व विषयांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. यासाठी नगरविकास खात्याचे राज्यमंत्री, अधिकारी व मी स्वत: आणि पालिका यांची पुढच्या महिन्यात स्वतंत्र बैठक बोलविली जाईल, असेही ते म्हणाले.येथील पाण्यातच हुशारी आहे...पालिकेच्या अनेक शाळांना नवीन इमारती, खोल्यांची आवश्यकता असल्याचं यावेळी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, महिला नगरसेविकांनी मंत्री तावडे यांना सांगितले. सर्वच शाळा गुणवत्तेच्या बाबतीत अव्वल आहेत. स्कॉलरशीप परीक्षेत पालिकेची मुलं पुढं आहेत, खूप हुशार आहेत, असं मुख्याधिकाऱ्यांनी तावडे यांना सांगितले. तेव्हा त्यांनी वाईच्या पाण्यातच हुशारी असल्याचं सांगत. वाईसाठी भरीव निधी देण्याची ग्वाही दिली.अन् सभागृहात हशा पिकला...निवेदनातील विषय न्याहाळत असताना मंत्री तावडे यांनी वाई पालिकेचे वार्षिक बजेट किती असं विचारलं असता नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी बजेट २२ कोटी असल्याचे सांगितले. यावर तुम्ही फक्त एक कोटी अधिक मागितले आहेत. एकच कोटी का मागितले? अधिक का मागितले नाहीत? दिले असते ना?, असं प्रतिप्रश्न करताच सभागृहात एकच हशा पिकला.
वाईसाठी २३ कोटींपेक्षा अधिक निधी देऊ
By admin | Published: May 19, 2017 11:31 PM