सातारा : पूर्वी शाळेत गोवर लस देताना मुलं इंजेक्शन नको म्हणून पळून जात असत. एवढेच नव्हे तर शाळेला दांडीही मारत होते; परंतु सध्या देत असलेल्या गोवर आणि रुबेला लसीकरण मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाहायला मिळत आहे. आरोग्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आणि रोगांसर्दभात होत असलेली जनजागृती याचे मूळ कारण या मोहिमेच्या प्रतिसादाला असल्याचे शाळेतील मुख्याध्यापक आणि पालकांचे म्हणणे आहे.लस टोचली गेली नाही तर त्याचे होणारे दुष्परिणाम मुले आणि त्यांच्या पालकांपुढे पूर्वी प्रभावीपणे पोहोचत नव्हते. शाळेत लस देणार आहेत, हे समजल्यानंतर अनेक मुले शाळेला दांडी मारत होते. अनेकांना इंजेक्शनची भीती तर काहींना लसीसंदर्भात गैरसमज होते. एकच इंजेक्शनची सुई आपल्याला टोचली जाईल, त्यातून दुसºयाच्या रोगाची लागण आपल्याला होईल, अशी भीतीही अनेक मुले बाळगत होते. मात्र, आता ही परिस्थिती राहिली नाही. आरोग्य विभागाने गेल्या महिनाभरापासून अत्यंत प्रभावीपणे लसीकरण मोहिमेची जनजागृती केली. त्यामुळे पालक आणि मुलेही सजग झाली. आपल्या मुलाच्या निरोगी आरोग्यासाठी प्रत्येक पालक जागृत झाले आहेत. मुलाला लस दिल्यानंतर त्याचे होणारे परिणाम आणि फायदे जाणून घेणारे पालक या मोहिमेदरम्यान आरोग्य पथकाला पाहायला मिळाले.पाटण तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यातील काही शाळांमध्ये तर गोवर, रुबेला लसीदरम्यान काही मजेशीर गोष्टी घडल्या. दंडामध्ये इंजेक्शन टोचल्यानंतर मूळ-मूळ रडणारी मुले फार पूर्वी गुरुजनांना पाहायला मिळत होती; परंतु आताची मुले आपल्या गुरुजनांकडून चक्क मोबाईलमध्ये फोटो काढून घेत होती. लहानपणी लस टोचलेल्याचा क्षण कायम आठवणीत राहावा, अशीही मुलांची धारणा होती.‘तुमची लस.. आमचे आरोग्य,’ अशी घोषणाही विद्यार्थी देत होते.सातारा तालुक्यातील परळी येथील छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्येही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमानिमित्त सुटीवर गेलेले पालक लस देण्यासाठी गावावरून मुलांना घेऊन शाळेत येत होते. या शाळेचे मुख्याध्यापक बी. एस. जाधव म्हणाले, ‘काही मुलांना इंजेक्शनची भीती वाटत होती. त्यामुळे मुले लस घेण्यास टाळाटाळ करत होते. अशा मुलांच्या पालकांना सांगितल्यानंतर पालक स्वत: शाळेत येत होते. तर काहीजण फोन करून मुलाला समजावून सांगत होते. त्यानंतर मुले सहमती दर्शवत होते.
आम्ही नाय घाबरत इंजेक्शनला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:30 PM