कोयनानगर : ‘कोयना परिसराच्या पाचवीलाच संकटे पूजली आहेत. आजपर्यंत कोयना परिवारातील प्रत्येकाने संकटाला धीराने तोंड दिले. या संकटावरही मात करू. यासाठी शासन तुमच्याबरोबर असून पुनर्वसनाचे काम जलदगतीने करण्यासाठी प्रसंगी कायदा बदलून काम करू. पण, कोयना भूस्खलनग्रस्तांना न्याय देऊ,’ अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
पाटण तालुक्यातील कोयना विभागात भूस्खलनाने मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे, बाजे, गोकुळ नाला आदी गावांत झालेल्या जीवित व वित्तहानीची पाहणी मंत्री शिंदे यांनी केली. तसेच मुंबईवरून आणलेल्या मदतीचे वाटपही केले. त्यानंतर स्थलांतरित केलेल्या लोकांबरोबर त्यांनी कोयनानगर येथील मराठी शाळा व हुंबरळी येथे संवाद साधला.
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार आनंदराव पाटील, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, पंचायत समिती सभापती राजाभाऊ शेलार, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक शशिकांत जाधव, हुंबरळीच्या सरपंच रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते.
नगरविकासमंत्री शिंदे म्हणाले, ‘कोयना विभागावर यापुढे संकट न येण्यासाठी शासन कायमस्वरूपी उपाययोजना करत आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी खर्च करू. या चार गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करताना धोकादायक जागेवर न करता सुरक्षित जागेची निवड ग्रामस्थांनी करावी. शासकीय जागा उपलब्ध नसतील, तर खासगी जागांची निवड करावी. खासगी जागा खरेदी करण्यासाठी शासन खर्च करणार आहे.
मिरगाव, बाजे येथील पूरबाधितांचे तात्पुरते स्थलांतर कोयना प्रकल्पाच्या मोकळ्या वसाहतीत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोयना प्रकल्पाच्या मोडकळीस आलेल्या खोल्यांची दुरुस्ती करून, या बाधितांचे तात्पुरते स्थलांतर होणार आहे, असेही मंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
...........................................................