छत्रपती संभाजी महाराजांवर भव्यदिव्य चित्रपट करणे काळाची गरज आहे. आम्ही लवकरच तो करणार आहोत, असे प्रतिपादन अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले. कराड येथे २८ एप्रिल ते ३ मे दरम्यान शिवपुत्र संभाजी महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
महानाट्या विषयी बोलताना कोल्हे म्हणाले, आपण चित्रपट बघतो आणि महानाट्य अनुभवतो .हा दोन्हीतला फरक आहे. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज ही भूमिका करण्यात मला जे समाधान आहे ते दुसऱ्या कुठल्याही भूमिका करण्यात मला मिळत नाही. पुढच्या पिढी समोर इतिहास पोहोचवण्याची संधी या दोन भूमिकांमधून मला मिळते. त्या संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न असतो.
त्याने इतिहास बदलतो का?धर्मवीर की धर्मरक्षक संभाजी महाराज? याबाबत तुमचे मत काय? याबाबत विचारले असता डॉ कोल्हे यांनी त्यांने इतिहास बदलतो का? असा उलट प्रश्न केला.
वेशभूषेला महत्त्व देण्यात अर्थ नाही -तुम्ही ऐतिहासिक चित्रपट, नाटक करण्यात आघाडीवर आहात .पण मध्यंतरी तानाजी चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी काही वाद निर्माण झाले. तेथे तुम्ही काहीही भाष्य केले नाही. याबाबत विचारले असता डॉ. कोल्हे म्हणाले, आपला इतिहास देश पातळीवर पोहोचवणारा तो पहिला चित्रपट म्हणून मी त्याकडे पाहतो. त्यामुळे मावळ्यांची वेशभूषा कोणती? याला महत्त्व देण्यात अर्थ नाही असे ते म्हणाले.