सातारा : कोरोना संकटाच्या काळात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यांच्याप्रमाणेच पत्रकारांनीही रस्त्यावर उतरून, सर्वात पुढे राहून लोकसेवा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पत्रकारांना कोरोना लस उपलब्ध करावी, अशी मागणी सातारा जिल्हा पत्रकार संघाने केली. दरम्यान, जिल्ह्यातील पत्रकारांच्या या मागणीचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, कार्याध्यक्ष शरद काटकर, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, राहुल तपासे यावेळी उपस्थित होते. गुरुवारी जिल्हाधिकारी यांना भेटून याबाबतचे निवेदन देण्यात आले.
हरीश पाटणे म्हणाले, आरोग्याचा बाका प्रसंग असतानाही पत्रकार खरी व वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवत होते. सातारा जिल्ह्यातील अनेक पत्रकारांनाही कोरोनासारखा दुर्धर आजार झाला तसेच चार पत्रकारांचे बळीही गेले. अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस.एम. देशमुख व किरण नाईक हे याबाबत राज्यपातळीवर प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिका-यांनी तातडीने अकराही तालुक्यांतील पत्रकारांसाठी मोफत कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी.
आमच्या निवेदनाची दखल घेऊन आपण तातडीने कोरोना प्रतिबंधक लस पत्रकारांसाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विनोद कुलकर्णी यांनी केली. जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, लसीबाबत पत्रकारांची मागणी रास्त आहे. मात्र, राज्य सरकारच्या गाइडलाइनप्रमाणे अद्याप तरी पत्रकारांना लस देण्याबाबत सूचना नाही. साता-यात पत्रकारांनी केलेली मागणी लक्षात घेऊन आपण लगेचच प्रस्ताव पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.