लोणंद : येथील इंदिरानगर रस्ता, मोरयानगर या भागात वाटसरू व या भागातील नागरिकांना बसण्यासाठी बाकडी ठेवण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणी मच्छरांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने युवकांनी स्वखर्चातून तणनाशक फवारणी केली.
या ठिकाणी मुख्य चौक असल्याने व या चौकात हायमास्क दिवाही बसविण्यात आला आहे. नागरिक या ठिकाणी शतपावली व थोडी विश्रांती घेण्यासाठी सायंकाळी येत असतात.
गेल्या अनेक दिवसांपासून बाकड्यालगत गवत, झाडी व दलदल वाढल्याने मच्छरांची पैदास झाल्याने या ठिकाणी पाच मिनिटेही बसणे मुश्कील झाले होते. नागरिकांना याचा खूपच त्रास सहन करावा लागत असल्याने तेथे स्वच्छता करणे गरजेचे होते. तसेच बाळासाहेब नगर येथे सार्वजनिक शौचालय परिसरात पण गवत वाढल्याने मच्छरांमुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. नगरपंचायत मात्र या ठिकाणी लक्ष देण्यास तयार नसल्याने सामाजिक बांधीलकी जपत काही युवकांनी एकत्र येत येथील गवत व झुडपांवर तणनाशकाची फवारणी करून स्वच्छता करून सामाजिक बांधीलकी जपण्याचे काम केले आहे.
यासाठी कय्युम मुल्ला, विकास पाटोळे, दीपक बाटे, दीपक जाधव, आदींनी परिश्रम घेतले.