लोणंद : विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाची माहिती प्रत्यक्ष अनुभवाने घेता यावी. या हेतूने प्रेरित होऊन जय भवानी एज्युकेशनच्या न्यू इंग्लिश स्कूल पाडेगाव येथील बालगोपाळांचा आठवडा बाजार आयोजित करण्यात आला होता.या संदर्भात विद्यार्थ्यांना चार दिवस अगोदर कल्पना देण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांनी जय्यत तयारी केली होती.
यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. बाजारात विकण्यासाठी विद्यार्थ्यांनी भाजीपाला कांदे, बटाटे, बटाटे वडा, भजी, पाणीपुरी, भेळ, आदी खाद्यपदार्थ, मेकअप साहित्य, प्लास्टिकची भांडी अशा विविध प्रकारच्या वस्तू आणलेल्या होत्या. सर्वात जास्त गर्दी खाद्यपदार्थाच्या स्टॉलवर पाहायला मिळाली. पाडेगावच्या बहुसंख्य ग्रामस्थांनी या बाजाराला भेट देऊन वस्तू विकत घेत विद्यार्थ्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या दोन-अडीच तासांच्या बाजारात चांगली विक्री विद्यार्थ्यांनी केली. पहिल्या स्वकमाईचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. पालकवर्गाची आपापल्या पाल्याकडून वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.
या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले. शालेय जीवंनातूनच विद्यार्थ्यांना असे व्यवहारिक ज्ञान आत्मसात करता आल्याने शाळेचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षक, शिपाई मधू सोनवलकर यांनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी पाडेगाव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.