नागठाणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सातारा तहसीलदारांच्या आदेशानुसार मंगळवारी होणारा नागठाणे येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती गावच्या सरपंच डॉ. रुपाली बेंद्रे यांनी दिली आहे.नागठाणे (ता. सातारा) हे तालुक्यातील बाजारपेठेचं मोठं गाव आहे. दिवसाकाठी जवळपास पन्नास गावांच्या संपर्कात येणार नागठाणे हे मोठं गाव असून, दररोज शेकडो चाकरमानी कामकाजासाठी तसेच शेकडो विद्यार्थी या गावातून मजल दरमजल सातारा येथे शिक्षणासाठी ये-जा करत असतात. आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी येथे बाजार भरत असून काशीळ, निसराळे, खोडद, अतीत, माजगाव, पाल खंडोबाची, हरपळवाडी, सासपडे, गणेशवाडी, निनाम, पाडळी, मांडवे, बोरगाव, भरतगाव, भरतगाववाडी तसेच वळसे आदी गावांतून बरेच ग्रामस्थ, महिला या आठवडी बाजारासाठी येत असतात. परंतु जिल्ह्यातील सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानुसार होणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला असल्याची माहिती गावच्या सरपंच बेंद्रे यांनी दिली आहे.
नागठाणे येथील आठवडी बाजार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 6:01 PM