कोरेगाव : सातारारोड, ता. कोरेगाव येथील बसस्थानकाच्या आवारात आठवडे बाजार सुरू करण्यात आल्याने त्याचा परिणाम एसटी बस वाहतुकीवर झाला आहे. वाहतूक नियंत्रकाला आता वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागत आहे. महामंडळाने याविषयी प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सातारारोडमध्ये अनेक वर्षांपासून सातारा रस्त्यावर आठवडे बाजार भरत होता. साधारणत: दुपारच्या सुमारास या बाजारात गर्दी होते, सायंकाळी उशिरापर्यंत हा बाजार सुरू राहत असल्याने पंचक्रोशीतील लोक सातारारोडमध्ये येत होते.
काही दिवसांपूर्वी या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले. बाजारामुळे वाहतूक कोंडी होत होती. त्याचबरोबर जरंडेश्वरसह विविध साखर कारखान्यांची वाहतूक याच रस्त्याने होत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत होती. अखेरीस स्थानिक प्रशासनाने आठवडे बाजार हा बसस्थानकाच्या आवारात सुरू केला. मात्र वाहतुकीची कोंडी झाली. बसचालकांना स्थानकात येताना आणि जाताना गर्दीमुळेवाट काढणे अवघड झाले होते अखेरीस वाहतूक नियंत्रकाला बाहेरच्या बाजूच्या वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागले. त्याचा परिणाम वेळापत्रकावर झाला आणि बसेस विलंबाने धावू लागल्या होत्या.
कोट..
पत्रव्यवहार केला, मात्र कार्यवाही नाही..
बसस्थानकाच्या आवारात आठवडे बाजार सुरू केल्याने एसटी वाहतूक विस्कळीत होत आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. त्याचबरोबर महामंडळाने स्थानिक प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्याप कार्यवाही झालेली नाही. प्रवाशांना स्थानकात येताना अडचण होत आहे. त्याचबरोबर एसटी वेळापत्रक विस्कळीत झाले आहेे.
- तानाजी सावंत, वाहतूक नियंत्रक, सातारारोड
२०कोरेगाव एसटी
फोटोनेम : सातारारोड बसस्थानकाच्या आवारात आठवडे बाजारातील विक्रेते बसू लागल्याने एसटी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.