पाचवड : जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिलेल्या आदेशानुसार शासकीय भरारी पथकाने सोमवारी किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या वजन काट्यांची अचानक तपासणी केली. किसन वीर कारखान्याचे वजनकाटे बिनचूक आणि बरोबर असल्याचे या भरारी पथकाच्या निदर्शनास आले.
किसन वीर साखर कारखान्याकडे गळितासाठी येणाऱ्या उसाचे वजन करण्यासाठी एकूण पाच अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वजन काटे असून त्यावर उसाने भरलेल्या वाहनांचे आणि रिकाम्या वाहनांचे वजन करण्यात येते. वजन काट्यांची क्षमता चाचणी या भरारी पथकाने प्रमाणित केलेल्या वजनांच्या साहाय्याने केली. तीही बरोबर व बिनचूक असल्याचे या पथकाने सांगितले. प्रत्येक वजन काट्याच्या बाहेरील बाजूस ऊस उत्पादक शेतकरी आणि वाहन मालकास दिसण्यासाठी डिस्प्ले बसविण्यात आल्याचेही या भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्याचबरोबर या पथकाने उसाचे वजन करून गव्हाणीकडे गेलेल्या ऊस वाहनांचे फेरवजन केले. तेही बरोबर असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले.
या भरारी पथकात वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापुरकर, नायब तहसीलदार वाय. एम. टोणपे, निरीक्षक वैद्यमापनशास्त्र डी. जी. कांबळे, पुरवठा अधिकारी बी. एस. जाधव यांचा समावेश होता. भरारी पथकास विठ्ठलराव कदम, केनयार्ड सुपरवायझर हणमंत निकम व केनयार्ड विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी कारखान्याचे वाहन मालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.