बागणी : माणुसकीला काळीमा फासणाऱ्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडामुळे एकीकडे सांगली जिल्हा हादरला असताना, बागणी (ता. वाळवा) येथे मुलीच्या जन्माचे स्वागत हत्तीवरून साखर वाटून करण्यात आले. याद्वारे मुलीचा जन्म नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात येथील कदम-सुखटणकर कुटुंबियांनी झणझणीत अंजनच घातले आहे. वाळवा तालुक्यातील बागणी हे वारणा नदीकाठावरील पुरोगामी विचारसरणीचे गाव आहे. येथील सुनील सुखटणकर यांची कन्या रूपाली यांचा विवाह सांगलीतील अवधूत कदम यांच्याशी झाला असून, अवधूत सांगलीतील खासगी कंपनीत नोकरी करतात. अवधूत-रूपाली या दाम्पत्याला २२ जानेवारीरोजी कन्यारत्न झाले. तिच्या जन्माच्या आनंदाने सर्व कु टुंबीय भारावले. तिच्या नामकरणाचा (बारशाचा) कार्यक्रम बागणी येथे रूपाली यांच्या माहेरी गुरुवारी (९ मार्च) आयोजित केला होता. कन्येचे नाव ‘दुर्वा’ ठेवण्यात आले. बारशावेळी कदम आणि सुखटणकर कुटुंबियांनी संपूर्ण गावात हत्तीवरून साखर वाटून ‘दुर्वा’च्या जन्माचे स्वागत केले. कोल्हापूर जिल्'ातील उदगाव (ता. शिरोळ) येथील जैन बस्तीमधील हत्ती मागविण्यात आला होता. या हत्तीवरून संपूर्ण गावात ५१ किलो साखरेचे वाटप करण्यात आले. म्हैसाळ येथील भ्रूण हत्याकांडामुळे जिल्हा हादरला असताना, मुलीच्या जन्माचे स्वागत हत्तीवरून साखर वाटून करून कदम-सुखटणकर कुटुंबीयांनी मुलीचा जन्म नाकारणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले आहे. याबाबत अवधूत कदम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले की, गावात मुलीच्या बारशावेळी हत्तीवरून साखर वाटून प्रबोधनाचा थोडासा प्रयत्न केला आहे. मुलीचा जन्म नाकारणे, स्त्री भ्रूणहत्या करणे ही निषेधार्ह गोष्ट आहे. ती करणाऱ्या सर्वांना कायद्याप्रमाणे शिक्षा झालीच पाहिजे. गर्भलिंग परीक्षण करणाऱ्या डॉक्टरांवर सरकारने केलेल्या कारवाया केवळ सोपस्कार वाटतात. यामध्ये लिंगनिदान करणारा व भ्रूणहत्या करणारा वैद्यकीय व्यावसायिक दोषी आहेतच, परंतु मुलगाच पाहिजे, असा हट्ट धरणारा पती, तथाकथित वंशावळीची शृंखला पुढे चालूच राहावी यासाठी वंशाच्या दिव्याचा आग्रह धरणारे विवाहितेचे सासू-सासरे आणि इतर नातलग हे सारेच कायद्यापुढे आणि माणुसकीच्यादृष्टीने अपराधी आहेत. त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे. (वार्ताहर) पेढ्यांना फाटा बागणी परिसरात आजवर मुलाच्या जन्माच्या निमित्ताने पेढे वाटले जायचे.
पेढ्यांना फाटा देत मुबलक ऊस पिकवणाऱ्या या गावात कदम-सुखटणकर परिवाराने ‘दुर्वा’च्या स्वागतानिमित्त पहिल्यांदाच हत्तीवरून साखर वाटली.