सातारा : विघ्नहर्ता गणरायाचे सातारा जिल्ह्यात सोमवारी उत्साही वातावरणात ‘डॉल्बी’विना स्वागत करण्यात आले. वाईमध्ये गणरायाच्या स्वागताला वरुणराजाने हजेरी लावली होती. साताऱ्यातील पंचमुखी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे वृक्षलागवडीचा संदेश देत आगमन झाले. सर्वांच्या लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी सातारा शहरासह जिल्हा आसुसलेला होता. बाप्पाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील सर्वच गावांतील बाजारपेठा फुलल्या होत्या. रविवारची साप्ताहिक सुटी जोडून आल्याने मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले होते. साताऱ्यात सोमवारी सकाळपासूनच बाप्पांना घरोघरी नेऊन स्थापना केली जात होती. लहान मुले-मुली, ज्येष्ठ नागरिक सहकुटुंब गणरायांना घरी नेताना दिसत होते. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने साताऱ्यातील मुख्य रस्ते फुलले होते. बाल हनुमान गणेशोत्सव मंडळ, केसरकर पेठ, प्रकाश मंडळ, शेटे चौक, सातारा, बोगद्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका निघाल्या होत्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्तींची रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू होती. मंगळवार तळे मार्ग, राजवाडा, राजपथ, खालचा रस्ता, वरचा रस्ता या मार्गावरून मिरवणूक निघाली होती. (प्रतिनिधी)वर्गणीदारांना रोपे भेटयेथील पंचमुखी गणेशोत्सव मंडळाने यंदा शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविली आहे. तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत ट्रॉलीत झाडे ठेवली होती. तसेच या मंडळाला कोणी देणगी दिल्यास त्याला रोपे भेट दिली जाणार आहेत.
‘डॉल्बी’विना गणरायांचे स्वागत
By admin | Published: September 06, 2016 1:27 AM