फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील चोपदारांचे शनिवारी पायी वारी करताना फलटण शहरात आगमन झाले. त्यांचे नगराध्यक्षांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा २ जुलैला प्रस्थान केल्यानंतर १९ जुलैला पंढरपूरला जाणार आहे. यंदा कोरोनामुळे पहिला मुक्काम देऊळवाडा (आळंदी)मध्ये म्हणजेच आळंदीत पार पडला. त्याप्रमाणे सोमवार, दि. १९पर्यंत देऊळवाड्यामध्ये माऊलींची पालखी राहणार आहे. १९ जुलैला पालखी देऊळवाड्यातून प्रस्थान करून वाखरी (पंढरपूर)ला जाणार आहे. बसमधून प्रवास असल्यामुळे आणि कोणत्याही गावामध्ये बस थांबवायची नाही, असा नियम असल्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे माऊलींचे पाय फक्त पंढरपूरला लागणार आहेत. माऊली नेहमीप्रमाणे फलटणवरून जाणार आहेत. परंतु, माऊलींचा मुक्काम नसल्यामुळे यावर्षी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार तसेच नरहरी महाराज आणि त्यांचे सहकारी यांनी प्रत्येक मुक्कामी एक किलोमीटर पायी वारी सुरू ठेवण्याच्या अनुषंगाने फलटणमध्ये त्यांचे आगमन झाले होते. त्यांचे आगमन म्हणजे प्रत्यक्ष माऊलींचे आगमन समजून प्रथेप्रमाणे फलटणच्या नगराध्यक्ष नीताताई नेवसे यांनी त्यांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले.
यावेळी श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट, पंढरपूरच्या सदस्य माधवीताई निगडे, माजी नगरसेवक मिलिंद नेवसे, सुरज नेवसे, विराज खराडे, सामाजिक कार्यकर्ते आमिरभाई शेख, ताजुद्दीन बागवान, युवराज शिंदे, मितेश खराडे, जीवन केंजळे उपस्थित होते. यावेळी राजाभाऊ चोपदार यांनी प्रसादाचे वाटप केले. प्रथेप्रमाणे सोमवार, दि. १२ रोजी फलटणमध्ये पालखी सोहळा येत असतो. मात्र, कोरोनामुळे पायी सोहळा नसल्याने प्रतिकात्मक माऊलींची समाजआरती मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करणार असल्याचे विराज खराडे यांनी सांगितले.
फोटो १० फलटण
फलटण येथे शनिवारी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार यांचे नगराध्यक्ष नीताताई नेवसे, मिलिंद नेवसे यांनी स्वागत केले. (छाया : नसीर शिकलगार)