सातारा : सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील सात महिलांच्या असामान्य कर्तृत्वाला सलाम करत सातारकरांनी ‘लोकमत सखी मंच’च्या ‘सखी सन्मान’ सोहळ्याला मनापासून दाद दिली. यावेळी या महिलांची अनोखी कहाणी ऐकताना अनेकांचे डोळे पाणावले. शाहू कला मंदिरात रंगलेल्या ‘सखी सन्मान’ सोहळ्याचा शुभारंभ दीपप्रज्वलनाने झाला. ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ विचारवंत संभाजीराव पाटणे, ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, अभिनेत्री लीला गांधी, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्सचे सुदाम दहिवाळ, इम्पे्रशन इन्स्टिट्यूट अॅण्ड ब्युटी सलूनचे अॅड. मिलिंद ओक व स्वाती ओक, साई कलेक्शनच्या दिव्या ठक्कर, प्रकृती हेल्थ रिसॉर्टचे डॉ. सुयोग दांडेकर, मंगलमूर्ती उद्योग समूहाचे सयाजी चव्हाण व कलाधाम ग्रुपच्या वैशाली राजेघाटगे आदी उपस्थित होते. माण तालुक्यातील पानवण येथे ऊसतोड मजुरांच्या अनाथ मुला-मुलींसाठी स्वखर्चातून आश्रमशाळा चालविणाऱ्या रमाताई तोरणे यांचा ‘सामाजिक’ क्षेत्रासाठी गौरव करण्यात आला. दहिवडी अन् कऱ्हाड परिक्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजकंटकांची पळता भुई थोडी करणाऱ्या पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांचा ‘शौर्य’साठी सन्मान करण्यात आला. परिचारिकेचा पेशा मोठ्या तन्मयतेने चालवत सामाजिक बांधिलकी पत्करलेल्या नलिनी जाधव यांचा सत्कार ‘आरोग्य’ क्षेत्रासाठी करण्यात आला. गेल्या तीन पिढ्यांपासून कोरेगाव तालुक्यातील वाठार परिसरात मोठ्या जिद्दीने खाणावळ चालविणाऱ्या विमल जाधव यांची ‘उद्योग’ जगतासाठी निवड करण्यात आली. निसर्गाने अन्याय केल्यानंतरही कागदावर विविध रंगछटांच्या माध्यमातून निसर्गाचेच अनोखे रूप प्रकट करणाऱ्या चित्रकार वर्षा माने यांच्याही कलेला ‘सांस्कृतिक’ क्षेत्रासाठी सलाम करण्यात आला. पाचवड सारख्या छोट्याशा गावात गेल्या अनेक वर्षांपासून गतिमंद मुलांसाठी प्रचंड संघर्ष करीत शाळा चालविणाऱ्या सुषमा पवार यांचाही ‘शैक्षणिक’ क्षेत्रासाठी सन्मान करण्यात आला. तसेच अत्यंत कमी वयात बॉक्सिंगमध्ये नैपुण्य मिळविणाऱ्या रोहिणी भोसले यांचाही ‘क्रीडा’ प्रकारासाठी यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजकत्व इम्प्रेशन इन्स्टिट्यूट आणि ब्युटी सलून व साई कलेक्शन यांनी स्वीकारले होते. (प्रतिनिधी) यमुनाबार्इंना ‘जीवन गौरव’ पुरस्कार ४लावणी क्षेत्रात अनेक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या लावणीसम्राज्ञी यमुनाबाई वाईकर या ‘लोकमत’चा ‘जीवन गौरव’ पुरस्कार स्वीकारण्यासाठी जेव्हा व्यासपीठावर आल्या, तेव्हा सभागृहातील तमाम प्रेक्षक आदराने उठून उभे राहिले. खूप वेळ टाळ्यांचा कडकडाट घुमत राहिला. ४व्यासपीठावर अभिनेत्री लीला गांधी अन् यमुनाबाई यांच्या गुजगोष्टी सुरू असताना यमुनाबार्इंनी थरथरत्या आवाजात ‘माझा सत्कार का केला जातोय?’ असा हळूच प्रश्न विचारला. तेव्हा लीलाबार्इंनी ‘तुम्ही शंभरी गाठली म्हणून हा सत्कार...’, असे सांगताच ‘मी कुठली शंभरची.. मी तर आता फक्त एेंशी वर्षाची,’ अशी ठसक्यात प्रतिक्रिया यमुनाबार्इंनी दिली. ४स्वत:चा भविष्यनिर्वाह निधी अन् निवृत्तवेतन अनाथ मुलांच्या आश्रमासाठी खर्च करणाऱ्या पानवणच्या रमाताई तोरणे यांना व्यासपीठावर भाषण करताना अॅड. मिलिंद ओक यांनी आर्थिक मदत जाहीर केली.
सखींच्या कर्तृत्वाला ‘लोकमत’कडून सलाम !
By admin | Published: October 29, 2016 12:26 AM