वेळे : पांडे-खानापूर हद्दीतील शेतात दहा-बारा टँकर मळीयुक्त रसायन टाकल्याने येथील शेतजमीन व हवामान प्रदूषित झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे वस्तीवर राहणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विहिरीतील पिण्याचे पाणी दूषित होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत भुईंज पोलीस ठाणे व सातारा येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार दाखल झाली आहे.
भुईंज पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे की, वाई तालुक्याच्या पूर्व भागातील पांडे आणि खानापूर हद्दीलगत असणाऱ्या दिलीप नथुराम चव्हाण यांच्या मालकीची जमीन व पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. या विहिरीच्या पश्चिमेस संतोष घाटे यांची शेतजमीन असून त्यात त्यांनी दहा ते बारा मळीचे टँकर गुरुवार, दि. ११ रोजी टाकले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून माशा घोंगावत आहेत. मळीचे हे रसायन दुर्गंधीयुक्त असल्याने येथील रहिवाशांना श्वास घेताना त्रास होऊ लागला आहे. या ठिकाणी रासायनिक मळी टाकताना अटकाव केला असता, ‘जमीन माझ्या मालकीची आहे व मी माझ्या जमिनीत काहीही करू शकतो,’ असे धमकीवजा उत्तर त्यांनी दिल्याने तक्रारदार दिलीप चव्हाण (रा. विठ्ठलवाडी, कवठे, ता. वाई) हे अचंबित झाले.
आपसातील वाद टाळण्यासाठी त्यांनी भुईंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तसेच सातारा येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळालाही अर्जाद्वारे कळविले होते. त्याची गंभीर दखल घेऊन प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दि. १३ रोजी पांडे-खानापूर हद्दीत असलेल्या तक्रारदार यांच्या शेतावर येऊन पाहणी केली. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले.