हणमंत यादव ।चाफळ : मराठा आरक्षणासाठी आंदोलनाचे रान पेटले असताना बुधवारी मुंबईत उसळलेल्या दंगलीमध्ये पाटण तालुक्यातील खोणोली येथील रोहन तोडकरवर अज्ञातांनी वार केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रोहनला सुटी होती म्हणून तो त्यावेळी मोर्चात गेलेला; पण उसळलेल्या दंगलीचा आणि धावपळीचा गैरफायदा घेत रोहनचा घात कुणी केला, असा प्रश्न सध्या नातेवाइकांना सतावतोय. हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्याच्या नातेवाइकांसह मराठा समाज बांधवांनी केली आहे.
रोहनचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका व पोलिसांचा फौजफाटा तसेच अन्य शासकीय वाहने शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खोणोलीकडे येत होती. याची माहिती मिळताच चाफळ विभागातील मराठा बांधव चाफळ येथे मोठ्या संख्येने एकत्र आले. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. मराठा बांधवांनी चाफळ येथे रास्ता रोको करत दुपारी दीड वाजेपर्यंत रुग्णवाहिका तसेच पोलिसांना रोखून धरले. त्यामुळे तणाव वाढत गेला. या दरम्यान आमदार शंभूराज देसाई यांच्यासह जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, महसूल व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
दुपारी एकच्या सुमारास पोलीस अधीक्षक संदीप पाटील व जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी तोडकर कुटुंबीयांशी चर्चा केली. यावेळी आमदार शंभूराज देसाई यांच्या मोबाईलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपर्क साधला. तोडकर कुटुंबीयांना सर्वतोपरी शासकीय मदत देण्याची तसेच रोहनवर हल्ला करणाºया हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आमदार देसाई यांना दिली. त्याबाबतची माहिती देसाई यांनी रास्ता रोको करणाºया मराठा बांधवांना दिली. तसेच जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनीही शासकीय मदत मिळण्यासाठी या घटनेचा सकारात्मक अहवाल शासनास पाठविला जाईल, अशी लेखी हमी तोडकर कुटुंबीयांना दिली.
आमदार देसाई यांनीही तोडकर कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली. मराठा क्रांतीच्या वतीनेही तोडकर कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत मराठा समाज स्वस्थ बसणार नसल्याचे समन्वयक शरद काटकर, जयेंद्र चव्हाण यांनी सांगितले. त्यानंतर मराठा बांधवांनी रास्ता रोको स्थगित केला. दुपारनंतर चाफळ परिसरातून रुग्णवाहिका खोणोली गावाकडे रवाना झाली. दुपारी खोणोलीत तणावपूर्ण वातावरणात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.चार तास रास्ता रोकोरोहनचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिका, शासकीय वाहने व पोलिसांची वाहने मुंबई येथून सकाळी नऊच्या सुमारास चाफळ येथे आली होती. यावेळी चाफळ येथेच संतप्त मराठा बांधवांनी रास्ता रोको सुरू केला. अखेर स्वत: मुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिल्यानंतर व प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी लेखी हमी दिल्यानंतर तब्बल चार तास सुरू असलेला रास्ता रोको दुपारच्या सुमारास स्थगित करण्यात आला. त्यानंतर रुग्णवाहिका खोणोलीकडे रवाना झाली.मराठा बांधवांनी केलेल्या मागण्यारोहनवर हल्ला करणाºया संशयितांवर कारवाई करावी.हल्लेखोरांना फाशीची शिक्षा व्हावी.तोडकर कुटुंबातील एक सदस्याला शासकीय नोकरीत घेण्यात यावे.रोहनला शहीद घोषित करण्यात यावे.तोडकर कुटुंबीयांना शासनाने मदत जाहीर करावी.रोहन रक्ताच्या थारोळ्यात सापडलामुंबईच्या कोपरखैरणे भागात बुधवारी निघालेल्या मोर्चाला सांयकाळी सहा वाजता हिंसक वळण लागले. यात रोहनवर आंदोलनाचा फायदा उठवत काही अज्ञातांनी त्याच्यावरच तडक हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून त्यांनी त्याला गंभीर जखमी केले. दरम्यान, मोर्चेकºयांना पांगवत असताना पोलिसांना रोहन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला. पोलिसांनी रोहन तोडकर याला तातडीने उपचारासाठी जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी सांगितले.टायर पेटवले; झाडे तोडलीचाफळ-उंब्रज रस्त्यावर रास्ता रोको करत चाफळ बसस्थानक व माजगाव येथे टायर पेटवून जमावाने संताप व्यक्त केला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पोवर व कर्मचाºयांनी जमावाला शांत करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यातच उंब्रज रस्त्यावर काहीजणांनी नजीकची झाडे तोडून टाकली. त्यामुळे काहीकाळ आणखी तणाव वाढला होता.सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनातचाफळ येथे मराठा बांधवांकडून रास्ता रोको सुरू झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी माजगावपासून चाफळकडे जाणारी वाहतूक रोखली. सर्व वाहने माजगावजवळच थांबवण्यात येत होती. माजगावपासून चाफळपर्यंत रस्त्यावर पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त तैनात केला होता. उंब्रज पोलिसांबरोबरच राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, कोपरखैरणे येथून आलेले पोलीस पथक, कोल्हापूर-सांगली येथून आलेली पोलीस पथके बंदोबस्तासाठी दाखल झाली होती.बुधवार ठरला घातवाररोहन हा आई-वडिलांना एकुलता एक होता. नवी मुंबई येथील कोपरखैरणेत आत्या व मामांकडे तो राहत होता. त्याठिकाणी एका टेलिकॉम कंपनीत तो नोकरीस होता. टॉवर लाईनला त्याची ड्यूटी होती. बुधवारी मराठा आंदोलनामुळे तो कामावर गेला नव्हता. परिसरात सुरू असणाºया आंदोलनाकडे दुपारी चार वाजता तो गेला. त्यानंतर परत आलाच नाही. बुधवार हा त्याच्यासाठी घातवार ठरला.आईसह नातेवाइकांचा आक्रोश : रोहनचा मृतदेह खोणोली येथे आणल्यानंतर त्याच्या आईने हंबरडा फोडला. ‘रोहन सोन्या कुठं मला सोडून गेलास,’ म्हणत तिने आक्रोश केला. यावेळी उपस्थित जनसमुदाय व नातेवाइकांनाही अश्रू अनावर झाले. रोहनचा मृतदेह त्याच्या घरासमोर ठेवला होता. यावेळी उपस्थितांनी अंत्यदर्शन घेतल्यानंतर संपूर्ण गावातून ट्रॅक्टरमधून मिरवणूक काढून येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.