सातारा : जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारे मदत करण्यात येते. याचप्रकारे आता पाटण तालुक्यातील काळोलीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्रातील पहिले बहुउद्देशीय कृषी संकुल उभे राहिले आहे. याठिकाणी दरवर्षी १० हजार शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणे देण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच विविध वाणांवर संशोधनही करण्याबाबत नियोजन आहे.
शेतीवर अवलंबून असणाऱ्या घटकांची संख्या मोठी आहे. यामधील महत्त्वाचा घटक शेतकरी आहे. शेतकऱ्यांना चांगल्या सोयी-सुविधा आणि प्रशिक्षण दिले तर चांगले उत्पन्न मिळेल, या उद्देशाने शासन प्रयत्न करत असते. अशाचप्रकारे पालकमंत्री देसाई यांच्या संकल्पनेतून काळोली येथे लोकनेते बाळासाहेब देसाई बहुउद्देशिय कृषी संकुल उभे राहिले आहे. येथे एकूण १६ एकर क्षेत्र आहे. त्यामध्ये संकुलाची इमारत उभी आहे.
या संकुलात दुर्गम भागातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण मिळेल. तसेच माती परीक्षण प्रयोगशाळाही असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनीत कोणती पिके घ्यावीत, हे तपासणीनंतर समजणार आहे. छोट्या भात गिरण्याही असतील. शेतकरी भात आणून तांदूळ कांडून घेऊन जाऊ शकतील. यासाठी लवकरच मशिनरी येणार आहेत. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. ऑइल मिलही असणार आहे. शेतकरी भुईमूग आणून तेल काढून घेऊन जातील. धान्य प्रतवारी केंद्रही असणार आहे. हे सर्व भाडेतत्त्वावर असणार आहे. याचा हजारो शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
पाटण तालुक्यातील कृषी संकुलात शेतकऱ्यांना विविध सोयी उपलब्ध होतील. दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळेल. तसेच केंद्रात दरवर्षी १० हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे शेतकरी जमिनीत नवनवीन प्रयोग करतील. हे केंद्र प्रक्रिया उद्याेग माहिती होण्याचे ठिकाण बनेल. तसेच कृषी प्रक्रियेतून रोजगार निर्मितीसाठी तरुणांना मदतही होईल. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी