सातारा : एका गट शिक्षणाधिकाऱ्याने महिला शिक्षिकेबाबत केलेले वर्तन शर्मनाक आहे. अशा गट शिक्षणाधिकाऱ्यावर काय कारवाई केली ते सांगा, असा सवाल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना केला. तर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्याला दोन गृहराज्यमंत्री आहेत. हे कोणालाच माहीत नाही, गंमत आहे की नाही, अशी खिल्लीही उडविली.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची भेट घेतली. या वेळी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर तसेच भाजपचे शहराध्यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, राहुल शिवनामे, मनीषा पांडे, सुनीशा शहा, रीना भणगे, दीपिका झाड आदी उपस्थित होते.
जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांना भेटल्यावर चित्रा वाघ यांनी शिक्षिकेशी गैरवर्तन करणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यावर जिल्हा परिषदेने काय कारवाई केली. अशा किती तक्रारी आहेत ते सांगा, अशी सुरुवातच केली. त्यानंतर त्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्याकडून चुकीचेच झाले आहे. कारण, मी शिक्षिकेच्या घरी जाऊन आले आहे. तिच्या असहायतेचाच फायदा घेण्याचा प्रकार यामध्ये झाला आहे. अधिकाऱ्यांनी अशा लोकांबद्दल संरक्षणाचीच भूमिका घेतली तर आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा, असेही स्पष्ट केले.
दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ७ जूनला बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानंतर वाघ या पुढील कार्यक्रमासाठी निघून गेल्या.
चौकट :
पालकमंत्र्यांना भेटायला वेळ नाही...
जिल्हा परिषदेत भेट देण्यापूर्वी चित्रा वाघ यांनी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पालकमंत्री व गृहराज्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका केली. राज्यात घाणेरड्या घटना होत आहेत. अधिकारी नक्की कोणाचा आदर्श घेत आहेत हेच कळत नाही. राज्यातील महिला व मुलीबरोबरच आता पोलीस दलातील महिलाही सुरक्षित नाहीत. राज्यात महिला सुरक्षेचा बोजवारा उडाला आहे. सातारा जिल्ह्यात तर लहान-लहान मुलीवर अत्याचार झाले. पालकमंत्र्यांना अशा ठिकाणी जाऊन भेट देण्यास वेळ नाही. राज्यात गृहराज्यमंत्री दोन आहेत. पण, त्यांचे स्टेटमेंट कधी येत नाही. त्यामुळे राज्याला दोन गृहराज्यमंत्री आहेत हेच कोणाला माहीत नाही. कोणालाही ते सांगता येणार नाहीत, अशा शब्दांत वाघ यांनी टीकास्त्र सोडले.
फोटो दि.०१सातारा झेडपी फोटो...
फोटो ओळ : सातारा जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची चित्रा वाघ यांनी भेट घेतली.
...................................................