लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : राज्यातील ताडोबा, सह्याद्री, टिपेश्वर, पांढरकवडा, सागरेश्वर, दाजीपूर, भीमा शंकर, रेहकुरी, नानज यासारखी वेगवेगळ्या वन्यजीवांसाठीची राखीव वन क्षेत्रे अस्तित्वात आहेत. यांच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्रपणे वन्यजीव व्यवस्थापन आराखडे तयार आहेत. मात्र, राखीव क्षेत्राशिवायही वरील प्राण्यांचा राज्यभर वावर व संख्या उर्वरित क्षेत्रात तुलनेने अधिक आहे. तरीही या क्षेत्रासाठी वन्यजीव व्यवस्थापन आराखड्याचा अभाव असल्याने मानव वन्यजीव संघर्ष हाताळण्यात यंत्रणा अपुरी ठरत आहे. हा संघर्ष जीवघेणा ठरू लागल्याने वन्यजीव राखीव क्षेत्र वगळून असलेल्या क्षेत्राचा जिल्हावार व्यवस्थापन आराखडा तयार करणे गरजेचे आहे.
वन्यजीव व्यवस्थापन आराखड्यामुळे या क्षेत्रातील वाघ, बिबट्यांसह इतर सर्व वन्यजीवांची गणना होऊन त्यांची संख्या सर्वसाधारणपणे निर्धारित होईल. त्यानुसार त्या त्या वन्यजीवांचे व्यवस्थापनामध्येही सुसूत्रता आणता येईल. याबरोबरीनेच सलगपणे सुरू असलेल्या वन्यजीव सनियंत्रणामुळे प्राण्यांचे भ्रमण मार्ग, वावरक्षेत्र, निर्धारित करता येतील. यातून भविष्यकाळात निर्माण होणाऱ्या मानव वन्यजीव संघर्षाची तीव्रता कमी होईल. भविष्यात वाघांसह इतर संकटग्रस्त, धोकाग्रस्त वन्यजीवांचे संवर्धन करणेही शक्य होईल.
चौकट :
संघर्षाची काय आहेत कारणे
मार्जार कुळातील बिबट्या, वाघ हे वावरक्षेत्र तयार करून ते राखणारे प्राणी आहेत. बिबट्या अनुकुलनामध्ये सर्वोच्च शिखरावर आहे. त्याच्या मूळ जंगली अधिवासापासून दूर मानवीवस्ती नजीक सहज मिळणाऱ्या भक्ष्यामुळे व ऊसशेतीतील सुरक्षित निवाऱ्यामुळे त्यांचे वावरक्षेत्र मानवीवस्तीपर्यंत पोहोचलंय, असे चित्र पश्चिम महाराष्ट्रात दिसते. तर विदर्भ मराठवाड्यात मात्र येथील व्याघ्र राखीव क्षेत्रात बिबट्यांच्या बरोबरीने वाघांची संख्या अतिरिक्त झाली आहे. परिणामी बिबट्यांप्रमाणेच तेही आता नवीन वावरक्षेत्र तयार करत आहेत. यातून प्रांतवार वाघ-बिबट-मानव संघर्षात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
पॉर्इंटर :
संघर्ष टाळण्यासाठी हे करता येईल
१. वन्यजीव राखीव क्षेत्रांप्रमाणेच उर्वरित वन व इतर क्षेत्रासाठी जिल्हावार वन्यजीव व्यवस्थापन आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.
२. वाघ व बिबट्यांच्या भक्ष्य प्रजातींची संख्या संतुलित राहण्यासाठी गवताळ कुरणांची निर्मिती
३. वाघ बिबट्यांसह सर्व प्राण्यांचे सनियंत्रण व्हावे
४. वन्यजीवांचे स्थलांतर मार्ग अबाधित राखण्यासाठी उपाययोजना
५. शहरे, नगरे गावांंमध्ये मोकाट जनावरे पोसली जाणार नाहीत याची व्यवस्था करणे
६. मोकाट कुत्र्यांचे शास्त्रीय पध्दतीने निर्बिजीकरण करणे
कोट :
वन्यजीव राखीव क्षेत्रांच्या तुलनेत उर्वरित क्षेत्रात वाघ बिबटसह इतर वन्यजीवांची संख्या जास्त आहे. त्यामुळे वन्यजीव राखीव क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रांसाठीही वन्यजीव व्यवस्थापन आराखड्याची आवश्यकता आहे.
- सुनील भोईटे, मानद वन्यजीवरक्षक, सातारा