नितीन काळेल
सातारा : कोरोना विषाणू संकटामुळे शाळा बंद आहेत. परिणामी जंतनाशक गोळ्या वाटपावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २८ टक्के बालकांत जंतदोष आहे. यामुळे आता २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान घरोघरी जंतनाशक गोळी वाटप मोहीम राबविली जाणार आहे.
आपल्याकडे १ ते १९ वर्षांतील मुलांसाठी जंतनाशक गोळ्या देण्यात येतात. वर्षातून दोनवेळा ही मोहीम राबविली जाते. यामध्ये फेब्रुवारी-मार्च आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान जंतनाशक गोळ्या बाळाला देण्यात येतात. मात्र, मागील वर्षभरात कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे वाटप रखडले होते. त्यासाठी आता २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात जंतनाशक गोळी वाटप मोहीम राबविण्यात येणार आहे. शाळा बंद असल्यातरी घरोघरी जाऊन मुलांना गोळ्या दिल्या जाणार आहेत.
जंतदोष असणारी मुले अशक्त होतात. त्यांना अभ्यासावर लक्ष ठेवणे कठीण जाते. तसेच जंतदोष हे कुपोषण आणि रक्तक्षयाचेही एक कारण आहे. या गोळ्यामुळे मुलांत जंताचा संसर्ग होत नाही.
............................
काय आहे जंतदोष...
जंतदोष म्हणजे दूषित मातीच्या संपर्कात आल्याने शरीरात जंताचा प्रादुर्भाव वाढतो. यामुळे शरीरातील रक्त कमी होणे, अशक्तपणा येणे, कुपोषण आदी आजार होत असतात.
...............
१९ व्या वर्षांपर्यंत द्याव्या लागतात गोळ्या...
१ ते ६ गटातील सर्व मुले व ६ ते १९ वर्षांतील शाळेत जाणारी मुले तसेच शाळेत न जाणाऱ्या बालकांना जंतदोष होऊ नये म्हणून गोळी देण्यात येते. ही जंतनाशक गोळी वर्षातून दोनवेळा देण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जाते. काही मुलांना तर घरी जाऊन गोळ्या दिल्या जातात.
.............................................
गोळ्यासाठी येथे संपर्क साधावा...
- शाळा बंद असल्यातरी आशा वर्कर, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाते.
- जंतनाशक गोळ्या मिळाल्या नसल्यास आशा सेविका, आरोग्य सेविका तसेच आरोग्य विभागाकडे संपर्क साधावा.
- जंतनाशक गोळ्यांचे सेवन केल्यास पोटाचे विकार होत नाहीत.
.........................
जिल्ह्यातील लाभार्थी...
जिल्ह्यात सध्या जंतनाशकच्या ७ लाख गोळ्या उपलब्ध आहेत. तर १ ते १९ वयोगटातील मुलांची संख्या ६ लाख ८० हजार आहे. या लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहेत.
.....................................
कोट :
जिल्ह्यात २१ ते २८ सप्टेंबर दरम्यान जंतनाशक गोळ्या वाटपाची मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून घरोघरी जाऊन गोळ्या वाटप केले जाईल. तसेच शासकीय रुग्णालयात गोळ्या उपलब्ध असणार आहेत.
- डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी
...................................................................