सातारा : शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर चालणाऱ्या सातारा जिल्हा बँकेचे संचालक अभ्यासाच्या नावाखाली युरोप दौऱ्यावर गेले आहेत. ही शेतकऱ्यांच्या घामाच्या कोट्यवधी रुपयांची सरळ सरळ उधळपट्टी आहे. त्यामुळे दौऱ्यावरून येताच संचालकांनी नेमका कोणता अभ्यास केला, याची परीक्षा शेतकऱ्यांसमोर द्यावी, असे आव्हान रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिले आहे.याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशात नावाजलेली आहे. मात्र, पडद्याआड चाललेले कारभार आता समोर यायला लागले आहेत. महाबळेश्वर, इस्रायल तसेच अनेक दौरे संचालकांनी करून अगोदरच शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये पाण्यात घातलेले असताना आता युरोप दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यामुळे पुन्हा एकदा लाखो रुपयांचा खर्च बँकेचा आणि परिणामी शेतकऱ्यांनी दिलेल्या व्याजाच्या पैशाचा होणार आहे.
वास्तविक सहकार क्षेत्र आणि युरोप राष्ट्रांचा काडीमात्र संबंध नाही. शेतकऱ्यांची पोरं म्हणून संचालक झालेले युरोप दौऱ्यावर नेमके कोणत्या अभ्यासासाठी गेले आहेत, याचीही चौकशी केली पाहिजे, अशीही आमची मागणी आहे.शेतकऱ्याच्या सातबारावर बँक बोजा चढवते, तसाच युरोप दौऱ्याच्या लाखो रुपये खर्चाचा बोजा दौऱ्यावर गेलेल्या १६ संचालकांच्या संपत्तीवर चढवण्यात यावा, अशीही आमची मागणी आहे, असेही प्रकाश साबळे यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.