कऱ्हाड : अर्थसंकल्पाच्या विशेष सभेनंतर कऱ्हाड नगरपालिकेत राजकीय वातावरण भलतेच तापले आहे. सभेत झालेल्या गदारोळानंतर नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, आदींनी पत्रकार परिषद घेऊन जलशक्ती व लोकशाही आघाडीवर टीका करीत खरपूस समाचार घेतला. ‘जनशक्ती’चे गटनेते राजेंद्र यादव यांनीही पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तर दिले. मात्र ‘लोकशाही’चे गटनेते सौरभ पाटील यांनी यावर कोणतेच भाष्य केलेले नाही. लोकशाहीच्या या चुप्पीमागे नेमकं दडलंय तरी काय? अशी चर्चा शहरात सुरू आहे.
कऱ्हाड नगरपरिषदेची अर्थसंकल्पीय सभा नुकतीच झाली. भाजप नगरसेवकाने सूचना वाचल्यानंतर लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे कऱ्हाडकरांच्या डोळ्यात धूळफेक असल्याची टीका केली. शहराच्या विकासासाठी गट तट न पाहता निधी आणला पाहिजे; पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे कऱ्हाडचेच आहेत. त्यांच्याकडेही आपण निधीसाठी पाठपुरावा केला पाहिजे; असे सांगत त्यांनी काही प्रश्नही सत्ताधाऱ्यांसमोर उपस्थित केले. मात्र, उत्तर कोणी द्यायचे हा प्रश्न समोर आल्यावर ज्यांनी सूचना वाचली, तेच उत्तर देतील, असा पवित्रा जनशक्ती आघाडीने घेतला. सभागृहात बहुमताचा आदर व्हायला हवा; भाजप वेगळा पायंडा पाडत आहे, अशी टीका राजेंद्र यादव यांनी केली आणि गदारोळास सुरुवात झाली.
सूचना की उपसूचना मंजूर यावरून सध्या कऱ्हाडचा अर्थसंकल्प कायद्याच्या कचाट्यात अडकला आहे. मात्र, दुसरीकडे नगरसेवक एकमेकांवर टीका करण्यात ‘मेहरबान’ होत आहेत. नगराध्यक्ष शिंदे व ज्येष्ठ नगरसेवक पावस्कर यांनी पत्रकार परिषद घेऊन जनशक्तीने आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी सभागृहांमध्ये गदारोळ केल्याची टीका केली. अर्थसंकल्पातील विषय थेट विशेष सभेत येत नाहीत? स्थायी समितीतच त्यावर चर्चा होते. तेथे जनशक्तीचेच बहुमत आहे; आणि लोकशाही आघाडीलाही प्रतिनिधित्व आहे. मग हे लोक तेथे का बोलत नाहीत? असा सवाल करीत स्थायीच्या बैठकीला फक्त चहा प्यायला जाता का? असे पावसकर म्हणाले. तर पालकमंत्र्यांचे बालक आताच विकासकामांसाठी जागे कसे झाले, अशी टीका नगराध्यक्षा शिंदे यांनी सौरभ पाटील यांच्यावर केली. त्यामुळे पालिकेतील वातावरण आणखी तापले आहे.
प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून जनशक्ती आघाडीचे गटनेते राजेंद्र यादव यांनी पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षांसह त्यांच्या चमूवर हल्ला चढविला. यांना शहराच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही. यांचे लक्ष फक्त टक्केवारीवर असल्याची टीका त्यांनी केली. परिणामी या आरोप-प्रत्यारोपांची उलटसुलट चर्चा शहरात सुरू आहे.
भाजप व जनशक्ती आघाडीत हा कलगीतुरा सुरू असताना लोकशाही आघाडी मात्र चुप्पी बाळगून आहे. तेही आरोपांचे खंडन करतील किंवा टीका करणाऱ्यांवर सडेतोड हल्ला चढवतील असे वाटत होते; मात्र त्यांनी मौनच राखले आहे. नजीकच्या काळातही ते काही बोलतील अशी शक्यता वाटत नाही. त्यामुळे नगराध्यक्षा व त्यांच्या चमूने लोकशाही आघाडीवर केलेली टीका त्यांना मान्य आहे म्हणायचं की ते त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत हे समजायला सध्यातरी मार्ग नाही; पण लोकशाहीच्या चुप्पीमागे नेमकं दडलंय काय? याचीही चर्चा शहरभर सुरू आहे.
चौकट :
ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी कऱ्हाड पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून चाळीस वर्षे कारभार पाहिला आहे. त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मंत्री बाळासाहेब पाटील काम करीत आहेत. या दोघांनी राजकारणात नेहमीच संयम ठेवल्याचे पाहायला मिळते. त्यांच्या कुटुंबातील सौरभ पाटील हे सध्या पालिकेत लोकशाही आघाडीचे नेतृत्व करतात. त्यामुळे तेही टीका होऊनही संयम राखून आहेत असेच म्हणावे लागेल.
फोटो :
6 सौरभ पाटील 01