सातारा : ‘केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी ‘प्रेम प्रकरणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात,’ असे असंवेदनशील वक्तव्य केले असून, अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार काय?,’ असा सवाल शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी शनिवारी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केला. सातारा येथील पोवई नाक्यावर शिवसेनेचे जिल्हा कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर, नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, नंदकुमार घाडगे उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केलेल्या वक्तव्यावरून नवीन वाद उफाळला आहे. शिवसेना हा पक्ष राज्यामध्ये भाजपसोबत असला, तरी सरकार म्हणून एकत्र काम करतानाही भाजप नेत्यांवर शिवसेना नेते टीका करायला मागे-पुढे पाहत नाही. खा. अनिल देसाई यांनीही राधामोहन सिंग यांच्या वक्तव्याबाबत कोरडे ओढले. ते म्हणाले,‘राधामोहन सिंग यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत जी काय मुक्ताफळे उधळली आहेत, त्यावरून शेतकऱ्यांच्याबाबतीत त्यांच्या संवेदना काय आहेत, ते समजते. अशा असंवेदनशील व्यक्तीला पदावर राहण्याचा अधिकार काय? त्यांच्या पक्षाने त्यांच्याबाबत कठोर निर्णय घ्यावा. दरम्यान, शिवसेना स्वबळावर लढली आहे. शिवसेना सरकारसोबत असली, तरी आमची बांधीलकी लोकांसोबत आहे. लोकांना आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी शिवसेनेकडे एकहाती सत्ता हवी आहे. येथून पुढच्या काळात ते सर्वांना दिसून येईल.’ (प्रतिनिधी) आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकारजमा नाही ‘शिवसेनेत कुठलाही कृत्रिमपणा नाही. लोकांच्या हितासाठी लढणारी संघटना म्हणूनच शिवसेनेकडे सामान्य जनतेने विश्वासाने कायमच पाहिले असून, आम्ही सरकारमध्ये असलो तरी सरकारजमा नाही,’ असे स्पष्टीकरण खासदार अनिल देसाई यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या शिबिरात केले.
राधामोहनना पदावर राहण्याचा अधिकार काय?
By admin | Published: July 25, 2015 11:59 PM