मलकापूर : मलकापुरात मूल्यवर्धित कराबाबतच्या नोटिसा मिळकतदारांच्या हातात पडल्या असून प्रमाणापेक्षा जास्त कर निदर्शनास आल्यामुळे या करवाढीविरोधात उद्रेक होण्याची शक्यता आहे़ करप्रणालीचे नेमके निकष काय, याबाबत नगरपंचायत कर्मचाऱ्यांनाच काहीही माहिती नसल्याची परिस्थिती आहे तर नगरसेवकही या विषयापासून अनभिज्ञ आहेत. करवाढीच्या निकषाबाबत नगरसेवकांनीही नेमकी माहिती नागरिकांना देता येत नसल्याची परिस्थिती आहे. अवास्तव नोटिसा हातात मिळाल्याने मिळकतदार मात्र चौकशीसाठी सैरावैरा धावताना दिसत आहेत़मलकापुरात गत चौदा वर्षे कोणत्याच प्रकारची करवाढ झालेली नव्हती. शासनाच्या नियमानुसार दर चार वर्षांनी करवाढ करणे स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक असते़ मात्र, मलकापुरात गत अनेक वर्षांपासून शहरात कोणत्याच प्रकारची करवाढ झालेली नव्हती. अशातच शासनाने नव्यानेच मूल्यवर्धित करप्रणाली लागू करण्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधन घातले आहे़ नगरपंचायत स्थापनेनंतर १४ वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मलकापुरात प्रथमच करवाढ लागू करण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला़ नवीन मूल्यवर्धीत करप्रणाली लागू करण्यासाठी एक वर्षापूर्वी शहरातील मिळकतींचे मोजमाप व मूल्यांकन करण्यासाठी त्रयस्थ संस्थेची कंत्राटी पध्दतीने नेमणूक करण्यात आली़ संबंधित संस्थेने मोजमाप व मूल्यांकन करून शहरातील मिळकतींच्या करप्राप्त नोटिसा काढण्यात आल्या आहेत़ या नोटिसा मिळकतदारांच्या हातात पडल्यानंतर पूर्वीपेक्षा अवास्तव कर असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.नगरपंचायत सभागृहात मिळकतींच्या वर्गीकरणानुसार १६ ते २२ टक्केच करवाढ होत असल्याचे पदाधिकारी सांगत आहेत़ नोटिसीत मात्र पूर्वीपेक्षा तिप्पट, चौैपट करवाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे़ ही वाढ कशी झाली, याबाबत त्रयस्थ संस्थेने काम केले असल्यामुळे नगरसेवकांना सांगता येईना तर कर्मचाऱ्यांना नेमके गणित कळेना, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी मिळकतदार संभ्रमात पडले आहेत़ नेमकी करप्रणाली कशी, याबाबत माहिती विचारली असता हे सर्व कंत्राटी संस्था सांगेल, असे पदाधिकारी व नगरपंचायत कर्मचाऱ्यांकडून सांगितले जाते. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे़ (प्रतिनिधी) चौदा वर्षे करवाढ केली नाही ही नागरिकांची चूक नाही़ करवाढ होणे अपेक्षित आहे़ ती २२ टक्के प्रमाणात झाली तर १ हजाराला वाढून १ हजार ३०० या पटीत वाढणे अपेक्षित आहे़ मात्र ज्या नोटीस दिल्या त्यामध्ये चौपट कर दिसून येत आहे़ - हणमंतराव जाधव, नगरसेवक करमागणीच्या नोटीसमध्ये चौपट कर आला आहे़ अंतर्गत रस्त्यालगत मिळकती असूनही एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर आला तर शहरात राहणे मुश्कील होईल़ याशिवाय नवीन करप्रणालीबाबत नगरसेवक, कर्मचारी यांना काहीही माहिती देता येत नाही़ - प्रभाकर साळुंखे, नागरिक राज्यातील इतर नगरपंचायतींच्या तुलनेत मलकापुरातील दर कमी आहेत़ नवीन करप्रणालीबाबत कोणतीही शंका असल्यास नगरपंचायतीच्या नवीन इमारतीत मी स्वत: सुट्टीच्या दिवसासह सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपस्थित राहणार आहे़- राजेंद्र तेली, मुख्याधिकारी अनेक प्रश्न अनुत्तरीत शहरात मूल्यवर्धित करप्रणाली लागू करण्यात आली आहे़ मात्र भांडवली की भाडेमूल्यावर मूल्य ठरवले? मिळकतीचे आयुष्य किती? प्रत्यक्ष बांधकाम झालेल्या वर्षाचे भांडवली मूल्य कसे काढले? भाडेमूल्यावर आधारित करप्रणाली असेल तर भाडेमूल्याचे निकष काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरीतच आहेत़ व्यावसायिक झोनमधील रहिवाशांची गोची नवीन कर आकारणीसाठी तीन झोन पाडण्यात आले आहेत़ महामार्ग दुतर्फा व कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याच्या दुतर्फा सन्मुख इमारतींचा व्यावसायिक झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे़ मात्र याच पट्ट्यात अनेक नागरिक रहिवासी म्हणून वास्तव्य करतात़ केवळ रस्त्याकडेला घर म्हणून दुप्पट कर भरावा लागणार असल्याने त्यांची गोची झाली आहे़ इतर करांचे मानगुटीवर भूत मलकापुरात नवीन करपध्दती लागू केली़ नव्यानेच संपूर्ण मिळकतींचे सर्वेक्षण करण्यात आले़ मुळातच संकलित करात वाढ झाली़ त्यातच भरीसभर म्हणून शासनाचा शिक्षण, वृक्ष व रोजगार हमी कराची टक्केवारी वाढली तर एकूण करांची रक्कम दुप्पट होत आहे़ हे इतर करांचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर बसले आहे़
करवाढ म्हंजी काय रं भाऊ?
By admin | Published: December 18, 2014 9:14 PM