सातारा : ‘साताºयाचे विद्यमान खासदार हे केवळ ‘स्टाईल’ मारण्यात पटाईत आहेत. मात्र या त्यांच्या स्टाईलमुळे लोकांचे जीवनमान उंचावणार नाही, बेरोजगारीही हटू शकलेली नाही. त्यामुळे या स्टाईलचा काडीमात्र उपयोग नाही,’ असा टोला शिवसेना-भाजपचे लोकसभा उमेदवार नरेंद्र पाटील यांनी लगावला. टोलनाक्याची ‘रसद’ बंद करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेना-भाजप व मित्र पक्षांतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेना उपनेते प्रा. नितीन बानुगडे-पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, आमदार शंभूराज देसाई, पुरुषोत्तम जाधव, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, उपजिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, ‘कोल्हापूर, पुणे ज्या पध्दतीने विकासाच्या वाटेने पुढे गेले, या शहरांतील औद्योगिक क्षेत्राला महत्त्व मिळालं, त्या पध्दतीने साताºयाला मिळालेलं नाही. प्रचंड दहशतीमुळे येथे उद्योग वाढत नाहीत. साताºयात वाद कशावरुन झाले, ते महाराष्ट्राला माहित झाले आहे. कोण कशासाठी जेलमध्ये गेलं, हेही माहित आहे. वास्तविक विद्यमान खासदारांनी विकासाच्या दृष्टिकोनातून निर्णय घ्यायला हवे होते, मात्र त्यांनी ते घेतले नाही. दहशतमुक्त सातारा जिल्हा करण्याचा उद्देश आम्ही निवडणुकीच्या अजेंड्यात घेणार आहोत.’