कुडाळ : जावळी तालुक्यातील ६३ गावांच्या ‘इको झोन’ निर्णयाबद्दल स्थानिक नागरिकांनी सोमवारच्या बैठकीत अस्वस्थता व्यक्त केल्यानंतर ‘हा निर्णय उपग्रहाच्या सर्वेक्षणातून झालाय, असे संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.’ त्यामुळं ‘आम्हाला आमच्याच जागेत बांधकाम करता येत नसेल तर मग काय आम्ही उपग्रहावर जाऊन राहयचं का?’ असा उद्विग्न सवालही अनेकांनी बैठकीनंतर व्यक्त केला. तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह झोन गावांमधील भूखंड आरक्षित ठेवण्यासंदर्भात नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या गावांमधील गायरान, शासकीय कार्यालय इमारतींसाठी क्रीडांगण, वाढीव गावठाण यादृष्टीने काही भूखंड इकोमधून वगळण्यासंदर्भात गावातील कमिटीने प्रस्ताव तयार करावयाचे आहेत. त्यानुसार काही भूखंड राखीव ठेवण्यात येणार आहे. परंतु या बैठकीस आलेल्या काही गावांमधील नागरिकांनी आपले गावच वगळता येईल का, याची मागणी केली.डोंगरमाथ्यावरील गावांचा समावेश इकोमध्ये आहे. परंतु डोंगरउतरावरील काही गावांचाही समावेश करण्यात आला आहे. अशा गावांमधील नागरिकांनी आपल्या संतप्त भावना पंचायत समिती परिसरात व्यक्त केल्या. मुळात धरणांमुळे तालुक्यातील अनेक गावे, गावांमधील नागरिक पुनर्वसित आले तर आता इको, ग्रीन झोन, व्याघ्र प्रकल्प यामुळे जावळीकरांवर मर्यादा येणार आहेत. परंतु इको झोनचे सर्वेक्षण उपग्रहावरून झाले असल्याची कारण पुढे आले असले तरी आता जावळीकरांनी उपग्रहावर जाऊन राहायचं का? असा सवाल उपस्थित केला. (प्रतिनिधी)इकोमधील गावांना प्रस्ताव पाठवून काही भूखंड आरक्षित ठेवता येईल; परंतु गावे वगळण्याचा अधिकार हा तालुका पातळीवर राहिला नसल्यामुळे यामधील कोणतीही गावे वगळता येणार नसल्याचे महसूल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे किमान भविष्याच्या दृष्टीने काही भूखंड आरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने गावपातळीवरील समितीने प्रस्ताव पाठवावेत, असे बैठकीत सांगण्यात आले आहे.
आम्ही काय उपग्रहावर राहायचं?
By admin | Published: February 18, 2015 10:48 PM