लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोनामुळे रुग्ण व नातेवाईकांची अवस्था केविलवाणी होत असताना काही तरुणांनी एकत्र येत सुरू केलेला '' सपोर्ट फॉर कोविड पेशंट '' हा व्हाॅट्सॲप ग्रुप कोरोनाग्रस्तांसाठी संकटमोचकाची भूमिका बजावू लागला आहे. रुग्णांना बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, प्लाझ्मा व जेवण देण्यापर्यंतची सर्व कामे या ग्रुपमधील तरुणाई निरपेक्ष भावनेने करत आहे. या तरुणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे सातारा जिल्ह्यातील शेकडो रुग्णांना जीवदान देखील मिळाले आहे.
कोरोना बाधितांचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने कोणाला बेड मिळत नाही तर कोणाला इंजेक्शन, उपचाराअभावी अनेक रुग्ण नातेवाईकांच्या डोळ्यादेखत तडफडून दगावू लागले आहेत. ही परिस्थिती बदलून कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या उद्देशाने मूळ अहमदनगर व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या कल्याणी संध्या अंकुश या तरुणीने '' सपोर्ट फॉर कोविड पेशंट '' या नावाने व्हाॅट्सॲप ग्रुप सुरू केला. समाज कार्याची आवड असलेले राज्यभरातील ४० हून अधिक तरुण या ग्रुपचा धागा बनले आणि या तरुणांचा आपापल्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना मदत करण्याचा लढा निरपेक्ष भावनेने सुरू झाला.
सातारा जिल्ह्यात येथील रोहित जाधव ,नम्रता पाटील, सुनील चव्हाण, ब्रिजेश रावल, महेश पानुगडे, विवेक काशीद, निलेश यादव, योगेश जगताप हे तरुण कोरोनाग्रस्तांसाठी झोकून काम करू लागले आहेत.
या तरुणांनी कोरोनावर उपचार करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची यादी संकलित केली आहे. रुग्णालयात भरती होणारे रुग्ण व कोरोनामुक्त होणारे रुग्ण यांची तरुणांकडून दररोज माहिती घेतली जाते. व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून फोन येताच हे तरुण रुग्णांना बेड, ऑक्सिजन, प्लाझ्मा तसेच गरजेनुसार जेवण देखील उपलब्ध करून देतात. या कामाचा कोणताही मोबदला ते घेत नाहीत. विशेष म्हणजे ही सर्व कामे ऑनलाईन व फोनद्वारेच केली जातात.
व्हाॅट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून या तरुणांनी आतापर्यंत जिल्ह्यातील सुमारे ५०० रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, इंजेक्शन, प्लाझ्मा आणि इतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
(चौकट)
चेहऱ्यावरील हास्य पाहून मिळते ऊर्जा
रुग्णांना निरपेक्ष भावनेने मदत करणे हाच आमच्या ग्रुपचा उद्देश आहे. जे रुग्ण बरे होऊन घरी जातात ते व त्यांचे नातेवाईक आम्हाला व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून व्हिडिओ कॉल करतात व आमच्याशी संवाद साधतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आम्हाला काम करण्याची प्रेरणा देते. हेच हास्य आम्ही कोरोना बाधित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर फुलविण्याचे प्रयत्न करीत आहोत, असे मत '' सपोर्ट फॉर कोविड पेशंट '' ग्रुपचा सदस्य असलेल्या रोहित जाधव याने व्यक्त केले.
(पॉइंटर)
१. प्लाझ्मासाठी ऋषी साबळे याची खूप मोलाची मदत झाली. त्यांनी ‘लढा रक्तदाना’चा उपक्रम राबवून प्लाझ्मासाठी लोकांना प्रवृत्त करून खूप मोठे काम केलं आहे.
२. ज्या लोकांना होम आयसोलेशनसाठी घर नाही त्या लोकांसाठी मलकापूर येथे गृहविलगीकरणाची व्यवस्था देखील उपलब्ध केली आहे.