औंध : औंध येथील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मागील दोन दिवसांत एकाचवेळी ४७ कोरोनाबाधितांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने परिसरात समाधानकारक वातावरण निर्मिती झाली आहे. सतत दोनअंकी रुग्णसंख्या सापडत असताना आता एक अंकीवर आल्याने कोरोनाला हरविण्यासाठी औंधकर सज्ज झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करून तब्बल ७० हजार रुपये रोख व अन्नधान्याची मदत कोरोनाग्रस्त कुटुंबाला ‘आपुलकी ग्रुपने’ करून माणुसकी जपली आहे.
औंधमध्ये एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढत चालला होता. दि. २० एप्रिल रोजी ग्रामपंचायत, व्यापारी व ग्रामस्थांनी जनता कर्फ्यू पुकारला, त्यानंतर आकडा आटोक्यात येईना म्हटल्यावर प्रांताधिकारी जनार्दन कासार व तहसीलदार किरण जमदाडे यांनी संपूर्ण औंध गाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले. हा वाढता धोका लक्षात घेऊन औंधमधील एका वस्तीत कोरोना चाचणीचा कॅम्प लावण्यात आला. त्यामध्ये अनेक जण बाधित निघाले. या सर्वांचे विलगीकरण औंध येथील आश्रमशाळेत करण्यात आले. त्या सर्व कुटुंबांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता व्हाॅट्सॲपच्या ‘आपुलकी ग्रुप’च्या माध्यमातून आवाहन करण्यात आले. त्या आवाहनाला औंधसह पंचक्रोशीतील व औंधप्रेमींनी भरभरून मदत केली. दोन दिवसांत सत्तर हजार रुपये जमा झाले व जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपातही मोठ्या प्रमाणात मदत झाली. ही सर्व मदत बाधित कुटुंबाना देण्यात आली. त्यांना आधार देण्यात आला.
या लढाईत औंध ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी आपापल्या वाॅर्डात कोरोनाला हरवायचे, या उद्देशाने वाॅर्डात स्वतः खांद्यावर पंप घेऊन वाॅर्डाचे निर्जंतुकीकरण केले.
(चौकट...)
अन् आत्मविश्वास वाढला
काही औंधकरांनी आपले घरचे, जवळचे, नातेवाईक, मित्रमंडळी गमावले आहेत. त्यामुळे आता हातात हात घालून कोरोनाला हरवूया, अशी आर्त हाक एकमेकांना देत आहेत, तर सामाजिक कार्यकर्त्यांनीदेखील जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. दोन दिवसांत ४७ रुग्णांनी कोरोनाला हरविल्यामुळे औंधकरांचा आत्मविश्वास वाढला आहे, लवकरच आम्ही औंध कोरोनामुक्त करू, असा निश्चय सर्वांनी केला आहे.
फोटो : १६ औंध
औंध येथील आश्रमशाळेत विलगीकरणात असलेल्या ग्रामस्थांनी कोरोनावर मात केल्याने सर्वांचे स्वागत करून त्यांना घरी सोडण्यात आले. यावेळी सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. (छाया-रशीद शेख)