सागर चव्हाण
पेट्री : कास पठार भागातील दुर्गम, डोंगरमाथ्यावरील बहुतांशी गावांमध्ये कड्याखाली तसेच डोंगरांमध्ये असणाऱ्या झऱ्याचे पाणी काही अंतरावरून शेणाने, चिखल मातीत सारवलेल्या आडात आणून रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने कास परिसरात केली जाते. शेताच्या उंच ठिकाणी आड तयार करून तळापर्यंतच्या वावराला पाणी पोहोचेल, अशी व्यवस्था याद्वारे केली जाते.
या परिसरात एक किंवा एकापेक्षा अधिक कुटुंबे आळीपाळीने गव्हाची शेती भिजवतात. दिलेल्या दिवसांची विभागणी करून जेवढे रान भिजेल तेवढे दिलेल्या मुदतीत वावर शेतकऱ्यांकडून भिजवले जाते.
डोंगरमाथ्यावर दरवर्षी अतिपर्जन्यवृष्टी होते. जमीन उताराची, मुरबाड असल्याने पावसाळ्यात सर्व पाणी वाहून जाते. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने बहुतांशी ठिकाणी झरे, उफळे फुटले जातात. सुरुवातीस झऱ्यांना खूप पाणी असते. जसजसा उन्हाळा येईल तसतसे झऱ्याचे पाणी कमी होते. शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याने भात काढल्यानंतर लगेच गहू पेरला जातो.
गव्हाला पाणी कमी पडू नये, यासाठी शेतकरी काही अंतरावरून पाट तसेच पाईप जोडून पाणी साठवणुकीसाठी एका आडात आणतात. साधारण आड बारा-पंधरा फूट लांब, सात-आठ फूट रुंद, पाच-सहा फूट खोल असतो. आडातले पाणी आटू नये, यासाठी चिखल माती, शेणाने आड वारंवार सारवला जातो. सकाळ-संध्याकाळ आड फोडून साधारण एका वेळेला गुंठाभर शेतजमीन भिजवली जाते.आळीपाळीने ज्याचा दिवस असेल ते आड फोडून शेतजमीन भिजवतात. त्यानंतर पुन्हा शेणाने सारवून त्यात पाणी तुंबवले जाते. शेतजमीन भिजवण्याची ज्यांची वेळ असेल त्यांच्याकडून झऱ्याच्या ठिकाणी छोट्याशा कुंडीतील, पाटातील साफसफाई केली जाते. पाणी कमी येत असल्यास खेकड्यांकडून आड अथवा पाट फोडला आहे का? यावर लक्ष ठेवले जाते.
आड शेणाने, चिखल मातीत सारवणे, लिपणे बऱ्याचदा करतात. सकाळी आड फोडल्यानंतर संध्याकाळपर्यंत पाण्याने भरला जातो. झऱ्याला मुबलक पाणी असूनही शेती भिजवता येत नाही; परंतु ते पाणी आडात साठवून ठेवल्यास शेतजमीन लवकर भिजवण्यास मदत होते. तासाभरात आड रिकामा होतो. पाटाऐवजी बऱ्याच ठिकाणी पाईपदेखील वापरतात. ऑक्टोबर,नोव्हेंबर ते फेब्रुवारी, मार्च असे सहा महिने आडाचा वापर होतो.
बहुतांशी ठिकाणी अनेकविध गावांत अशा प्रकारची पारंपरिक जलव्यवस्थापन व्यवस्था पाहावयास मिळत आहे. एक दिवस सगळे एकत्रित येऊन आड बनवतात. आपल्याला मिळालेल्या कालावधीनुसार साधारण दोन दिवसांत जेवढे रान भिजेल तेवढे भिजवले जाते. नंतर दुसऱ्याची बारी येते. -प्रदीप शिंदे, कासाणीमुरा