उंब्रज : रक्ताची नाती जेव्हा दूर करतात तेव्हा मदतीला माणुसकीचं नातं येतं. असं घडलंय म्होप्रे येथील भाजलेल्या चार वर्षांच्या चिमुकल्याबाबत. कोणतेही नातं नसताना सोशल मीडियावरील एका मेसेजवरून या चिमुकल्याच्या मदतीला पोलीस ‘मामा’ बनून धावले. त्यांनी त्याच्या ऑपरेशनसाठी चक्क शहाहत्तर हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत केलीय.
कऱ्हाड तालुक्यातील म्होप्रे येथील चार वर्षांचा श्लोक आप्पा बुधावले हा चिमुकला. वडिलांनी सोडून दिल्यामुळे आई जागृती बुधावले यांच्याबरोबर तो आजोळी राहत होता. मिळेल ते काम करून जागृती या श्लोकचा सांभाळ करीत होत्या. एका महिन्यापूर्वी श्लोक घरात खेळत असताना गंभीररीत्या भाजला. त्याला उपचारांसाठी दवाखान्यात दाखल केले. एकुलत्या एका मुलाच्या उपचारासाठी माउली धडपडू लागली.
आर्थिक बाजू कमजोर असल्याने श्लोकवर उपचार कसे होणार, हा प्रश्न निर्माण झाला. त्यात त्याची सर्जरी केली पाहिजे. त्यासाठी दोन लाख रुपये खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या माउलीचे हातपायच गळाले. ही अवस्था बघून एकाने श्लोकच्या फोटोसह मदतीच्या आवाहनाचा मेसेज सोशल मीडियावर टाकला.
हा मेसेज उंब्रज पोलीस ठाण्यातील कर्मचारी दत्तात्रय लवटे यांनी पाहिला. कायम इतरांना मदत करण्यासाठी तत्पर असणाऱ्या, २०१४ साली पोलिसांत भरती झालेल्या पोलिसांच्या ग्रुपवर त्यांनी हा मेसेज पाठविला. ग्रुपमधील सदस्यांनी शक्य तेवढी मदत करण्यास सुरुवात केली आणि दोन दिवसांत चक्क ७६,५०० रुपये जमा झाले. दत्तात्रय लवटे व त्याच्या सहकाऱ्यांनी श्लोकवर उपचार सुरू असलेल्या कऱ्हाड येथील चैतन्य बालरुग्णालयामध्ये जाऊन जागृती बुधावले यांना ही रोख मदत दिली.
कोणतेही रक्ताचे नाते नसताना हे पोलीस माणुसकीच्या नात्यातून मामा बनून श्लोकच्या मदतीला आले. या भरीव मदतीमुळे श्लोकवरील ऑपरेशनला येणारी आर्थिक अडचण दूर झाली. उर्वरित रक्कमही लोकांच्या मदतीतून जमा झाली आहे. श्लोकवर आज, शुक्रवारी शस्त्रक्रिया होणार असल्याचे जागृती बुधावले यांनी सांगितले.
कोट...
आम्ही २०१४ मध्ये पोलीस भरती झालेल्या पोलिसांचा व्हाॅट्सॲपवर ग्रुप केला आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पारदर्शक पोलीस भरती प्रक्रिया राबविल्यामुळे आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील युवक पोलीसमध्ये भरती झालो, याची जाणीव आम्हाला आहे. त्यामुळे आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही कायम गरजूंना आम्हाला शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करीत असतो. श्लोकची यशस्वी शस्त्रक्रिया होईल. तो त्याच्या पावलांनी त्याच्या घरी चालत जावा, एवढीच अपेक्षा.
- दत्तात्रय लवटे, पोलीस कॉन्स्टेबल, उंब्रज पोलीस ठाणे