दहिवडी : पांढरवाडी, ता. माण येथे माथेफिरूने झाडाची कत्तल केली असून, दहिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झाली नाही. त्यानंतर या तुटक्या बुंध्यांना जणू भाले फुटले असून संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, पांढरवाडी ग्रामस्थांनी या घटनेचा कडाडून निषेध केला असून गुरुवार, दि. १९ रोजी सकाळी ग्रामसभेचे आयोजन केले आहे. अशी माहिती सरपंच पुष्पलता सूर्यवंशी यांनी दिली.तर दुसरीकडे या घटनेच्या निषेधार्थ मुंबई येथे स्थायिक असलेल्या पांढरवाडीसह चार गावातील ग्रामस्थांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.सिने अभिनेते सयाजी शिंदे, सुभाष घाडगे महाराज, तुषार खरात प्रशासकीय विभाग यांच्या पुढाकाराने व लोकसहभागाने पांढरवाडी, दिवडी, कोळेवाडी, गोडसेवाडी या ठिकाणी २५ हजार झाडांची लागवड केली आहे. तर दहिवडी-सातारा रस्त्यावरील पांढरवाडी बसस्टॉप ते जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी दुतर्फा वृक्षांची लागवड केली होती. मात्र, पण काही विकृत मनोवृत्तीच्या नतद्रष्टाने यातील ५० झाडे सोमवारी मध्यरात्री तोडून टाकली. या घटेनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.त्यानंतर पोलिस विभागीय अधिकारी यशवंत काळे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार सुरेखा माने, सहायक पोलिस उपनिरीक्षक युवराज हांडे यांनी घटनास्थळाची पाहणी केली होती. या घटनेला ४८ तास उलटले तरी कोणालाही अटक झाली नाही. यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.हा रस्ता जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण ६३ क्रमांकाचा असून, या झाडांची देखभाल ग्रामपंचायतीकडे आहे. बुधवारी चार वनक्षेत्रपाल, अधिकारी राजेंद्र धुमाळ, वनपाल काश्मीर शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मुख्यमंत्र्यांनी घटनेची दखल घ्यावीजलयुक्त शिवार अभियानाच्या चळवळीअंतर्गत ही झाडे लावली होती. या चार गावांतील लोकांनी अभूतपूर्व अशी एकजूट करून महाराष्ट्रात आदर्शवत ठरतील, अशी कामे केली आहेत; पण अशा सामाजिक कार्यात अडथळे आणणाऱ्या समाजकंटकांवर पोलिस काहीच कारवाई करणार नसतील तर चांगल्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोबल खचले जाईल. या चार गावांतील जलयुक्त शिवार अभियानातील कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
तुटक्या बुंध्यांना जेव्हा भाले फुटतात...
By admin | Published: January 19, 2017 12:29 AM