सातारा : दिवाळीची पहिली पहाट सुरमय करून सातारकरांना आनंद देणाऱ्या ‘केव्हा तरी पहाटे’ या कार्यक्रमाचा दहावा अध्याय गांधी मैदानावर गायला गेला. अवीट गाण्यांनी बुधवारी सातारकर रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. या कार्यक्रमाची सुरुवात गायक अमोल बावडेकर, नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी राज्य वाहतूकदार संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश गवळी, नगरसेवक निशांत पाटील, व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद सारडा, दिलीप गवळी, अॅड. मुकुंद सारडा, सलीम कच्छी, धनंजय कुलकर्णी यांची उपस्थिती होती.अमोल बावडेकर यांच्या ‘ओंकार स्वरुपा तुज नमो’ या गणेश स्तुतीने आरंभ झाला. जुन्या, नव्या मराठी गाण्यांचा हा नजराणा सादर होताना सातारकरांनी आपला पायात ठेका धरला होता. राजन घोणे, पूर्णिमा भावसार आंग्यले, साथीला सांगलीचे प्रसाद लिमये यांनी हा कार्यक्रम उंचीवर नेला. अलका सावंत यांच्या ‘केव्हा तरी पहाटे’ या शिर्षक गीतानंतर दिवाळीचे गाणे अर्थात ‘आली माझ्या घरी ही दिवाळी’हे गीत पूर्णिमा यांनी सादर केले. पं. जितेंद्र अभिषेकींचा जादुई स्वर लाभलेले कैवल्याच्या चांदण्याला भूकेला चकोर हे गीत अमोल बावडेकर यांनी सादर केले. हा गाण्याचा प्रवास पुढे सुरू राहात राजन घोणे यांचे आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा, शूर आम्ही सरदार, दूर किनारा राहिला सादर होऊन परिकथेतील राजकुमारा, घरकुल चित्रपटातील मलमली तारुण्य माझे, प्रेमाला उपमा नाही, धुंदी कळ्यांना, पाहिले न मी तुला, श्रीरंग गोडबोले यांचे मुंबई-पुणे मुंबई चित्रपटातील ‘नवे कधी तू’ हे गीत प्रसाद लिमये यांच्याकडून सादर झाले. त्यानंतर हा सागरी, येशील राणी या गीतांच्या सादरीकरणानंतर थोडी वेगळी वाट चोखाळत ढोलकीच्या ठेक्यावर लावणीचा रंग भरत ‘या रावजी बसा भावजी’ सादर झाली.कार्यक्रमात गायकांबरोबरच संगीत साथ करणारे दीपक सोनावणे, धनंजय कान्हेरे, शांताराम दयाळ, बासरीवादक रसुली मुलाणी, सचिन कवितके, केदार गुळवणी, किरण ठाणेदार, रमाकांत पालेकर, राजेश हेमंत, ध्वनी संयोजक नंदकुमार सव्वाशे यांचा सत्कार कंदी पेढे देऊन करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दलही अॅड. बाबर यांचा सातारकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम सातारचा एक पॅटर्न झाल्याचे गौरवोद्गार अॅड. मुकुंद सारडा यांनी काढले. (प्रतिनिधी)
‘केव्हा तरी पहाटे’ने घेतला रसिकांच्या मनाचा ठाव
By admin | Published: October 23, 2014 9:02 PM