सातारा : पाटखळ (ता. सातारा) येथे मंगळवारी (दि. २९) दोन एकर ऊस जळून एका शेतकऱ्याचे तीन लाखांचे नुकसान झाले. या प्रकारानंतर राजकीय वातावरण तापले असून, आमदार शशिकांत शिंदे यांनी हे विरोधकांचे कृत्य असू शकते, असा संशय व्यक्त केल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी त्यांच्यावर आपण ५०० कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे आव्हान दिले आहे.सातारा तालुक्यातील पाटखळ येथील नाथाजी आनंदराव बाबर (वय ७१) यांच्या शेतातील दोन एकरातील ऊस जळून खाक झाला. यामध्ये त्यांचे सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी त्यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हा ऊस जाळला की जळाला, याबाबत हवालदार हेमंत शिंदे हे तपास करत आहेत.दरम्यान, आमदार महेश शिंदे यांनी बुधवारी दुपारी पाटखळ ग्रामस्थांना सोबत घेऊन पोलिस अधीक्षक समीर शेख यांची भेट घेतली. या प्रकरणातील वस्तुस्थिती समोर आणून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.यावेळी आमदार महेश शिंदे म्हणाले, ऊस जळीत प्रकरणात शशिकांत शिंदे यांनी माझे नाव घेऊन खालच्या पातळीवर टीका केली आहे. या प्रकरणातील माणसांची नावे जाहीर करावी नाहीतर शशिकांत शिंदे यांच्यावर पाचशे कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे.माझ्या माणसाने जर ऊस पेटवल्याचे सिद्ध झाले तर मी राजकारणातून संन्यास घेईन, असे आव्हान महेश शिंदे यांनी आमदार शशिकांत शिंदे यांना दिले.पाटखळमधील ऊस जळीत प्रकरणात विरोधकांचा हात असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली आहे. त्यामध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही. मात्र, विरोधकांनी त्याचेही राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. पाटखळमधील जनता सुज्ञ आहे. असा कोणताही प्रकार ते खपवून घेणार नाहीत, असे मत आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
पाटखळच्या ऊस जळीत प्रकरणावरून राजकारण पेटले, महेश शिंदे यांचा शशिकांत शिंदे यांच्यावर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 3:30 PM