सातारा : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त सातारा जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने दाभोलकरांच्या खुनाच्या सूत्रधारांचा तपास त्वरित लावण्याबाबत अंधश्रध्दा समितीच्या वतीने शुक्रवारी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
निवासी जिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे की, २० ऑगस्ट २०२१ ला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांच्या खुनाच्या सूत्रधारांचे काय झाले ? त्यांना कधी पकडणार? डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या सूत्रधारांचा त्वरित तपास लावून कायदेशीर कारवाई करण्याची महाराष्ट्र अंनिसतर्फे शासनाला या निवेदनाद्वारे करण्यात आली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे या संशयित आरोपीविरुद्ध सीबीआयने अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. तसेच अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयित आरोपींच्या विरुद्धदेखील अजूनही आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या खुनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे. या खुनामागील सूत्रधार कोण आहेत? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास होऊन डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनामागील सूत्रधार कोण आहेत हे सीबीआयने शोधून काढले पाहिजे, अन्यथा देशातील विवेकवादी विचारवंत, कार्यकर्ते, पत्रकार यांच्या अभिव्यक्तीला असलेला धोका संपणार नाही. आमच्या या मागण्या आपण शासनापर्यंत पोहोचवाव्यात, असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्यकारी समिती सदस्य डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, जिल्हा कार्याध्यक्ष वंदना माने, जिल्हा प्रधान सचिव हौसेराव धुमाळ, भगवान रणदिवे, राजेंद्र पवार, विलास भांदिर्गे, अभय भांदिर्गे, शंकर कणसे, सीताराम चाळके, दशरथ रणदिवे, जयप्रकाश जाधव, डॉ. दीपक माने, दिलीप महादार, रामचंद्र रसाळ, योगिनी मगर, रूपाली भोसले, दिलीप कणसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
फोटो नेम : २०सागर
फोटो ओळ : सातारा येथे निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे यांना अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले.