१५ महिन्यांचा पगार थकला!
कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम!
तारीख पे तारीख...१५ महिन्यांचा पगार थकला! कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालून करतायत काम!
लोकमत न्यूज नेटवर्क
रशिद शेख
औंध : औंधसह खटाव-माण तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षकांचा पगार गेली पंधरा महिने झाला नसून, त्यांनी नेमके घर कसे चालवायचे, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. या महिन्यात नाही तर पुढील महिन्यात होईल, या आशेने गेली पंधरा महिने पगारच झाला नाही. या कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याने संसार उघड्यावर पडण्याची व त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. त्यामुळे ''बिनपगारी फुल्ल अधिकारी'' अशी अवस्था ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षारक्षकांची झाली आहे.
औंध ग्रामीण रुग्णालयात औंध भागातील सुमारे २५ गावांमधील वाडया-वस्त्यांवरील रुग्णांची, नागरिकांची होणारी गैरसोय दूर होण्यास मदत होत आहे. या ठिकाणी बऱ्याच प्रमाणात वर्दळ असल्याने सुरक्षारक्षक आपले काम चोख बजावतात. आता तिथेच असणाऱ्या शेजारील नवीन इमारतीत ३० बेडचे कोरोना सेंटर उभे राहिले आहे. तिथेही तसेच लसीकरणास ते रूग्णालयाच्या कामातही प्रशासनाला मदत करत असतात, मात्र, प्रामाणिकपणे आपले कर्तव्य निभावून पगार वेळेवर होत नसेल, तर एवढा जीव धोक्यात घालून जगायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
औंध हे गाव परिसरातील अनेक गावांसाठी मध्यवर्ती केंद्र बनले आहे. त्याचबरोबर औंध हे धार्मिक व पर्यटन दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. याठिकाणी असणारे ग्रामीण रुग्णालय हा रुग्णांसाठी जिव्हाळयाचा विषय आहे. मुळातच रुग्णालयात अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णालयात कधी कधी वादावादीचे प्रसंग उदभवल्यास सुरक्षारक्षक येणाऱ्या पेशंटला योग्य मार्गदर्शन करत असतात. आता लसीकरणासाठी येणाऱ्या मोठ्या गर्दीला शिस्त लावण्याचे कामही तेच करतात.
सध्या कोरोनाच्या भयंकर साथीतही आपले कर्तव्य ते बजावत आहेत. सुरक्षारक्षकांना कामाची गरज असल्याने आजपर्यंत ते संयमाने काम करीत आहेत, मात्र, एवढ्या प्रामाणिकपणे काम करून केलेल्या कामाचे दाम मिळत नसल्याने रुग्णालयातील चार सुरक्षारक्षकांच्यात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. प्रशासनाने लक्ष घालून पगार लवकरात लवकर करावेत, अशी मागणी सुरक्षारक्षक करू लागले आहेत.
कोट
कामावरून घरी गेले की पहिला प्रश्न कुटुंबातील सदस्यांचा असतो की "काय कळाले का पगाराचे"कधी होणार आहे, तुम्हाला बोलता येत नाही का? अशा अनेक प्रसंगांना कुटुंब चालविताना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर पगार व्हावा, हीच आमची मागणी आहे
सागर घार्गे,
सुरक्षारक्षक, ग्रामीण रुग्णालय, औंध.