वेळे आशियाई पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पुणे ते सातारा दरम्यान बऱ्याच ठिकाणी रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य तर काही ठिकाणी रस्त्यांवर ओरखडे ओढले गेले आहेत.
महामार्गावर जोशी विहीर ते पाचवड दरम्यान तब्बल एक वर्षापासून रस्त्यावर मारलेले ओरखडे अजूनही बुजवले गेलेले नाहीत. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.
महामार्गावर अचानकपणे नजरेस पडणाऱ्या या ओरखड्यांची धास्ती सर्वच वाहनचालकांना वाटते. विशेषत: दुचाकीस्वारांना तर विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा त्या ओरखड्यांमधून वाहनाचा टायर घसरुन भीषण अपघात होण्याची दाट शक्यता आहे.
या ओरखड्यांबाबत वाहनचालकांमधून तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. गाडीचे टायर लवकर खराब होणे, टायर फुटणे, गाडी घसरणे यासारख्या शक्यतांमुळे येथे अपघातजन्य स्थिती निर्माण होऊ लागली आहे. तसेच यापूर्वी अनेकदा याठिकाणी अपघातदेखील झाले आहेत. हे ओरखडे उड्डाणपुलावर असल्याने पुलाच्या कणखरतेचा प्रश्नदेखील उपस्थित होत आहे.
गेल्या वर्षभरापासून पडलेल्या ओरखड्यांमुळे या रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांना दुचाकीवरून जाताना भीती वाटू लागली आहे. येथील रस्त्याचे काम पूर्ण करुन वाहनचालकांना दिलासा द्यावा, अशीच मागणी वाहनचालक करत आहेत. या रस्त्याच्या ठेकेदाराने हे काम त्वरित पूर्ण करून येथील अपघात रोखण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फोटो आहे.