भुर्इंज : तब्बल बाराशे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा चार दिवसांचा ठिय्या. हा मुक्कामही उभाारण्यात आलेल्या तंबूंमध्ये. तंबू सजावट करताना कल्पकतेने राबलेले चिमुरडे हात तितक्याच गतीने तंबूच्या बाजूला मांडलेल्या चुलीवर स्वयंपाक करण्यासाठीही सफाईने फिरताना दिसतात. या हातातून साकारलेली सजावट, उभारलेली गुढ्या, तोरणं, रेखाटलेली वारली पेंटिंग आणि त्याचसोबत ज्या कारणासाठी एकत्रित जमले त्याचेही साधलेले अचूक नियोजन. स्काउट गाईड मेळाव्याच्या निमित्ताने येथील किसनवीरनगर येथे भरलेला हा बाळमेळा म्हणजे परिसरातील ग्रामस्थांसाठी आनंदाची पर्वणी ठरला आहे. सातारा जिल्हा भारत स्काउट आणि गाईड, किसन वीर कारखाना, जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी किसनवीरनगर येथे बालनगरीच अवतरली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने जमलेल्या या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा मेळावा यशस्वी पार पडावा यासाठी सातारा जिल्हा भारत आणि स्काउटचे अध्यक्ष आर्यल नायकवडी, जिल्हा चिटणीस कुसूम लोंढे, जिल्हा आयुक्त अरविंद देशमुख, वर्षा पतंगे, जिल्हा संघटक गजानन गायकवाड, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त शुभदा महाबळेश्वरकर, सुरेंद्र शिंदे त्यांचे सर्व सहकारी, किसन वीर कारखाना परिवार विशेष प्रयत्न करत आहे. (प्रतिनिधी)शारिरीक कसरती व साहसी खेळांचे आयोजनचारही दिवस शारीरिक कसरती व साहसी खेळ, शेकोटी कार्यक्रम, लोकनृत्य, अन्नकोट व संचलन, शोभायात्रा असे विविध भरगच्च कार्यक्रम आहेत. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील ५९ प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील बाराशे विद्यार्थी येथे आले आहेत. या ठिकाणी या विद्यार्थ्यांनीच आपापले तंबू उभारले आहेत. हे तंबू विविध कलाकुसर करून सजवले आहेत. कुणी त्यासाठी खड्यांची रांगोळी काढली आहे, कुणी पताका लावल्या आहेत, कुणी गुढ्या तोरणं उभारली आहेत, कुणी चक्क तंबूच्या दारात तुळस तर कुणी तंबूत शिवाजी महाराजांचीही स्थापना केली आहे. तंबूच्या कडेने शेणाने सारवलेल्या कापडी भिंतीवर काढण्यात आलेली वारली पेंटिंग्ज तर अनेकांची दाद घेत आहे. अशा प्रकारे सजलेली ही बालनगरी पाहण्यासाठी परिसरातील गावांमधील ग्रामस्थ सहकुटुंब येथे येत आहेत. मेळाव्यातील सर्व कार्यक्रम पार पाडतानाच सकाळ-संध्याकाळ स्वयंपाकासाठी चिमुरड्यांची लगबग कौतुकास्पद ठरत आहे.चोख व्यवस्थापनकारखाना व्यवस्थापनाने या विद्यार्थ्यांना मुबलक पाणी, स्वच्छतागृह, वीज अशा सर्वच सुविधा देताना पहाटे चार वाजल्यापासून गरम पाणी भरलेले टँकर उपलब्ध केले आहेत. याआधीच्या मेळाव्यांमध्ये अशी सोय नव्हती, त्यामुळे अंघोळीची टाळाटाळ होत असे.
कुठं गुढ्या, तोरणं.. कुठं वारली पेंटिंग!
By admin | Published: February 11, 2015 9:19 PM