कऱ्हाड : शहरातील रस्त्यांची डागडुजी, पाणीपुरवठा योजनेचे काम, सिग्नल व्यवस्था, कोल्हापूर नाक्यावरील स्वागत कमान, टाऊन हॉल अशा रखडलेल्या विकासकामांतील निधी गेला कुठे ? असा सवाल करत शिवसेनेच्या वतीने गुरुवारी शंखध्वनी आंदोलन केले.शहरातील प्रलंबित विकासकांमांवरून गुरुवारी पालिकेसमोर शिवसनेचे कऱ्हाड दक्षिण तालुका प्रमुख शशिकांत हापसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शंखध्वनी आंदोलन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, तालुका प्रमुख नितीन काशिद, शहर प्रमुख शशिराज करपे, उपशहरप्रमुख सतीश तावरे, कऱ्हाड उत्तर तालुका प्रमुख विनायक भोसले, शेखर बर्गे, अमित देवकर, क्रांतीवीर काळे, चंद्रकांत गायकवाड, किरण साबळे आदी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांना निवेदन देण्यात आले. व त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी शशिकांत हापसे म्हणाले, ‘शहरातील रस्त्यांची तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती करत दिवाळीपर्यंत रस्ते कारपेट करण्यात येणार असल्याचे पालिकेकडून आश्वासन देण्यात आले होते. परंतु याबाबत कोणताही ठोस निर्णय अद्यापपर्यंत झाला नाही. याबाबत पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसल्याने ही विकास कामे प्रलंबित राहिली आहे. याचा आता कऱ्हाडकरांना त्रास होऊ लागला आहे. नागरिकांना अंधारात ठेवून ‘वायफाय’ योजना तातडीने मंजूर होते. मग शहरातील विकास कामे का होत नाही. याबाबत तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.’शहरात विकास कामे चालूच आहेत. आज शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्या मार्गी लावल्या जातील असे, आश्वासन मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांनी दिले.(प्रतिनिधी) शिवसेनेच्या मागण्याकोल्हापूर नाका ते कृष्णा नाका येथील रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा.रिलायन्स कंपनीची कामे थांबविण्यात यावीत.वायफाय सुविधेबाबत योग्य ती माहिती द्यावी.स्वागत कमानीचे काम सुरू करावे.बिघडलेली सिग्नल यंत्रणा सुरू करावी.चोवीसतास पाणीपुरवठा योजनेच्या कामाची चौकशी व्हावी.तुम्हीच जनतेचे मालक ‘कऱ्हाड शहरातील करण्यात येणाऱ्या विकासकामांची जबाबदारी सर्वस्वी पालिकेच्या मुख्याधिकारी यांची आहे. त्यांनीच शहरातील प्रश्नांबाबत लक्ष देणे गरजेचे आहे. शेवटी जनता ही मुख्याधिकारी यांनाच मानते. शेवटी तुम्हीच जनतेचे मालक आहात,’ असे मुख्याधिकारी प्रशांत रोडे यांना बैठकी दरम्यान शिवसेना तालुका प्रमुख नितीन काशिद म्हणाले.
विकासकामांतील निधी गेला कुठे?
By admin | Published: December 11, 2015 12:05 AM