पांडुरंग भिलारे ल्ल वाई वाईत नागरीकरण, औद्योगीकरण आणि शहराचा पसारा झपाट्याने वाढत असताना शहरातील नागरिकांची आगीपासून सुरक्षा करण्याची यंत्रणा मात्र उपलब्ध नाही. मंगळवारी रामडोह आळीत आग लागल्यावर पालिकेस फोन केला असता ‘बंब नाहीच तर पाठवू कुठून,’ असे उत्तर ऐकावे लागले. वाढते नागरीकरण पाहता अत्याधुनिक, सुसज्ज अग्निशमन दलाची वाई नगरपालिकेला तातडीने गरज असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. वाई शहरात अनेक वाडे, ऐतिहासिक इमारती आहेत़ शहराजवळच औद्योगिक वसाहत आहे़ तसेच वाई हे ऐतिहासिक शहर असून, प्रसिध्द पर्यटनस्थळ असल्याने राज्यासह देशभरातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे़ त्याचबरोबर वाई शहर व परिसर चित्रीकरणासाठी प्रसिध्द असून अनेक हिंदी, मराठी चित्रपटांचे चित्रीकरण परिसरात सतत सुरू असते. वाईपासून जवळच मांढरदेव देवस्थान आहे़ तेथेही भाविक मोठ्या संख्येने भेट देतात. शहरात अगीच्या अनेक घटना वारंवार घडत असतात़ शहरातील रस्ते व गल्ल्या अरुंद असल्याने आग विझविताना अडचणी येत आहेत. पालिकेकडे एक बंब होता; पण हा जुना बंब १ लाख ३० हजारांत विकण्यात आला; यामुळे सध्या वाई शहर बंबाविनाच आहे़ नवीन बंब खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कर आकारण्यात येऊ नये, अशी मागणी विरोधकांनी पालिका सभेत केली होती. त्याचबरोबर वाई शहरात आग लागून दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला होता. नवीन बंब खरेदीसाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे़; त्यामुळे आग लागल्यास नियंत्रण कसे मिळविणार, असा प्रश्न उपस्थित झाला असून, लिलावत विकलेला बंब पालिकेने माघारी आणावा किंवा तूर्त भाडेतत्त्वावर घ्यावा; अन्यथा कोणताही अनर्थ घडल्यास आम्ही नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना जबाबदार धरू, असे सचिन फरांदे यांनी म्हटले होते़ आग विझविण्याची यंत्रणा सध्या उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे़ बाहेरून बंब मागविण्याची नामुष्की पालिकेकडे स्वत:चे अग्निशमन दल नसल्याने आग लागल्यावर मोठी दुर्घटना घडल्यास प्रचंड हानी होऊ शकते. शहरामध्ये कोणत्याही भागात अचानक आग लागल्यास बाहेरून बंब मागवायला लागणे ही दुर्दैवाची गोष्ट आहे़ सध्या तरी पालिकेचा बंब उपलब्ध नसल्याने शहराची सुरक्षा रामभरोसे आहे़ पालिका वाहन घसारानिधीतून अग्निशमन बंब खरेदी करणार आहे़ त्याची पक्रिया सुरू आहे़ या पक्रियेला दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे़ सध्या गरज पडल्यास खासगी टँंकर उपलब्ध केला जातो़ तसेच प्रसंगी पाचगणी पालिकेच्या बंबाचीही मदत घेतली जाते़ - आशा राऊत, मुख्याधिकारी, वाई नगरपालिका पालिकेने नवीन बंब खरेदी करण्यापूर्वी जुना विकण्याची गरज नव्हती़ पालिका घरपट्टीत दोन टक्के अग्नीकर लावते. त्याचा लाखो रुपयांचा महसूल दरवर्षी जमा होतो़ मंगळवारी लागलेल्या आगीच्या नुकसानीची भरपाई पालिका निधीतून करण्यात यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत़ नवीन बंब येईपर्यंत होणाऱ्या प्रत्येक दुर्घटनेची नुकसान भरपाई पालिकेने द्याावी़ - सचिन फरांदे, नगरसेवक सुसज्य अग्निशमन दल ही शहराची मूलभूत गरज आहे़ वाई हे महत्त्वाचे व गुंतागुतींचे शहर आहे़ आग लागल्यावर पहिला एक तास महत्त्वाचा असतो़ पालिकेने या समस्येवर त्वरित तोडगा काढून नवीन बंब खरेदी करावा. - डॉ़ प्रकाश पोरे, नागरिक, वाई
आगीचा बंब नाहीच तर पाठवू कुठून..?
By admin | Published: January 13, 2016 10:12 PM