राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा गुरुवारी वाढदिवस होता. सातारा तालुक्यातील काही नेत्यांचा एक पाय राष्ट्रवादीत अन दुसरा भाजपमध्ये आहे. दोन्ही पाय कुठे ठेवायचे? हा यक्षप्रश्न त्यांना सतावतोय. अजितदादांचा सातारा जिल्हा बालेकिल्ला आहे. जिल्ह्यातील काही नेते तर दादांच्या अत्यंत जवळचे, त्यांच्या मनात स्थान असलेले आहेत. मात्र मागील विधानसभा निवडणुकीच्या राजकीय घडामोडींमध्ये बालेकिल्ल्यातील काही नेत्यांनी घड्याळ काढून ठेवून कमळ हाती घेतले होते. आता या नेत्यांना दादांसह देवेंद्र साहेबांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. मात्र जाहीरपणे या शुभेच्छा देणं अवघड झालेलं. विशेष म्हणजे दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी...शुभेच्छांचे शब्द ओठाच्या बाहेर कसे आणायचे...सध्या आपल्याला दोघेही जवळचे आहेत. आपण नेत्यांसोबत कोणाला शुभेच्छा देणार, असं गंमतीनं एका नेत्याला विचारलं. तर हा नेता म्हणाला. आमच्या शुभेच्छा दोघांसोबतच आहेत. पहाटेचा शपथविधी जर यशस्वी झाला असता ना तर शहरातच काय पण संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये दादांसह देवेंद्रजींचे शुभेच्छा फलक लावले असते. तुमच्या पेपरच्या पानोपानी देखील शुभेच्छांच्या जाहिराती दिल्या असत्या. सध्या मात्र आळीमिळी गुपचिळी अशी परिस्थिती आहे. तुम्हीच समजून घ्या. काही दिवसांनंतर नेते जो आदेश देतील, तेव्हा करु की शुभेच्छांचा वर्षाव!
(सागर गुजर)