लोकमत न्यूज नेटवर्क
फलटण : फलटण तालुक्यात गेल्या ३० वर्षांपासून नामशेष झालेले पांढरे सोने म्हणून ओळखले जाणारे कापूस पीक आता तालुक्यात पुन्हा बहरू लागले आहे. शेतकऱ्यांनी ऊसाबरोबर कापसाची शेती सुरू केली आहे. येथे पणन (कापूस) खरेदी केंद्र पुन्हा सुरू केल्यास चांगला दर मिळून आणखी शेती वाढून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत.
फलटण तालुका रब्बीचा म्हणून ओळखला जातो. मात्र, मागील तीन-चार वर्षांपासून पाऊस चांगला होऊ लागल्याने खरीप हंगामही शेतकरी घेऊ लागले आहेत. खरीप हंगामात अनेकजण वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करू लागले आहेत.
फलटण तालुक्याच्या अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. खरिपाच्या पिकांसाठी शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. पावसाने ओढ दिल्याने पिकांनी माना टाकायला सुरुवात केली होती. नीरा उजव्या कालव्यावर अवलंबून असणारे शेतकरी कालव्याचे पाणी नेमके कधी सुटणार, याची वाट पाहत होते.
महिनाभरापासून पावसाने दडी मारली, त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने उकाड्याने नागरिक हैराण झाले. परंतु, गेल्या चार-पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. जिरायती भागात महिना-दीड महिन्यापूर्वी अपुऱ्या पावसामुळे पेरणी झाली नव्हती. बागायती नीरा उजव्या कालव्यावर व नीरा नदीवर अवलंबून असणाऱ्या भागात ऊस उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या ऊसाच्या लागवडी होत आलेल्या आहेत तर काही ठिकाणी कापसाच्या लागवडी सुरू आहेत. शेतकऱ्यांचे पांढरे सोने म्हणजे कापूस होय.
सुमारे ३०-३५ वर्षांपूर्वी फलटण तालुक्यात विशेषतः पूर्व भागात मोठ्या प्रमाणात कपाशी पीक घेतले जात होते. मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादनामुळे फलटण, बरड, आसू येथे शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली होती. फलटण, बरड, गुणवरे, आसू, खटके वस्ती येथे कापसापासून सरकी बाजूला काढणाऱ्या जिनिंग काढण्यात आल्या होत्या. मात्र, दिवसेंदिवस कापूस उत्पादन घटल्याने जिनिंग बंद पडल्या. त्या ३० वर्षांपासून बंदच आहेत. कालांतराने पिकावर पडणारी कीड, हमीभाव मिळत नसल्यामुळे तालुक्यातून कापूस पीक पूर्णपणे नामशेष झाले. काळाच्या पडद्याआड गेलेले कपाशी पीक मोठ्या धाडसाने काही शेतकऱ्यांनी घ्यायला सुरुवात केली. चार वर्षांपासून पुन्हा हळूहळू कापूस लागवडीमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. यापूर्वी उन्हाळ्यात घेतले जाणारे हे पीक आता पावसाळ्यातही घेतले जात आहे.
चौकट..
शेतकऱ्यांकडून शासकीय दरापेक्षा कमी दराने कापूस खरेदी!
गतवर्षी कपाशी पिकाला पाच ते साडेपाच हजार रुपये दर मिळाला. यावर्षी दर वाढवून मिळेल, या अपेक्षेने कापूस पीक लागवडीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र नसल्याने परजिल्ह्यातील खासगी व्यापारी शेतकऱ्यांकडून शासकीय दरापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून होणारी लूटमार थांबविण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
(कोट..)
चार-पाच महिन्यांत पैसा मिळवून देणारे पीक शेत जमिनीसाठी बेवड चांगला असतो, म्हणून या पिकाकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. कापूस लागवड करणाऱ्यांकडून अनेकजण नवीन लागवड करण्याच्या दृष्टीने माहिती घेताना दिसत आहेत. भविष्यात ऊसाबरोबर कापसाचे पीकही तालुक्यात महत्त्वाचे म्हणून ओळखले जाऊ शकते.
फोटो आहे..
१५ फलटण
फलटण तालुक्यात पांढरं सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाच्या क्षेत्रात वाढ होताना पाहायला मिळत आहे.