सातारा : मुख्याधिकारी अभिजित बापट यांची उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली, तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे सातारा पालिकेची सूत्रे सोपविण्यात आली आहेत. मात्र, दोन्हीही मुख्याधिकाऱ्यांना अद्याप कार्यमुक्त न करण्यात आल्याने सातारा पालिकेला नक्की मुख्याधिकारी कोण? या प्रश्नावरून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी प्रशासकीय कामकाजाचा उत्तम समन्वय असणाऱ्या अभिजित बापट यांनी २०१२ ते १६ या कालावधीत जिल्हा प्रकल्प संचालक व सातारा पालिका मुख्याधिकारी अशी सलग सेवा बजाविली. दि. १२ ऑगस्ट २०२० रोजी बापट यांची सोलापूर महापालिकेतून साताऱ्यात मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. दहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी कास धरण, भुयारी गटार योजना, पंतप्रधान आवास योजना अशा महत्त्वाच्या कामांना गती दिली. त्यांची नुकतीच पिंपरी चिंचवड महापालिकेत उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली, तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे सातारा पालिकेची सूत्रे सोपविण्यात आली; परंतु कोरोना संक्रमणाचा काळ असल्याने दोन्ही मुख्याधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नाही.
अभिजित बापट यांचे कामकाज सध्यातरी साताऱ्यातूनच सुरू आहे. नगरपालिका प्रशासन अधिकारी व मुख्याधिकारी अशा दोन्ही जबाबदाऱ्या ते पार पाडत आहेत. सातारा शहराचा सखोल अभ्यास असल्याने अभिजित बापट यांची बदली रद्द करून त्यांना पुन्हा साताऱ्यात आणण्यासाठी राजकीय घडामोडी सुरू आहेत, तर दुसरीकडे डॉ. विजयकुमार थोरात येत्या काही दिवसांत सातारा पालिकेत रुजू होणार असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे सातारा पालिकेला नेमके मुख्याधिकारी कोण? या प्रश्नावर नागरिक संभ्रमात आहेत.
(चौकट)
कामे मार्गी लावण्याचे आव्हान
पालिका निवडणुकीला साडेचार वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली तर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांची तारीख जाहीर होऊ शकते. आगामी निवडणुकीसाठी कमी कालावधी असल्याने शहर विकासाची कामे मार्गी लावण्याचे आव्हानही पालिका प्रशासनापुढे असणार आहे. या सर्व प्रक्रियेत मुख्याधिकारी हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे पालिकेत सुरू असलेला संगीत खुर्चीचा खेळ तातडीने थांबणे गरजेचे आहे.
लोगो : सातारा पालिका