साहिल शहाकोरेगाव : ‘राज्यात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारला कोणी विचारानासे झाले आहे. कोकणातील बारसू रिफायनरीचा प्रश्न चिघळला असताना सरकार दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात उतरले आहेत. अरे महाराष्ट्रात तुम्हाला कोण ओळखत नाही, अन् कर्नाटकात कोण ओळखेल?, असा जोरदार टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.कोरेगाव येथे सोमवारी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवस अभीष्टचिंतन सोहळा व कोरेगाव बाजार समिती निवडणुकीच्या विजयी सभेत ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संचालक सत्यजितसिंह पाटणकर, प्रदीप विधाते उपस्थित होते.अजित पवार म्हणाले, ‘उंब्रजमध्ये एका व्यक्तीचा चक्क मनगटापासून हात वेगळा करण्याचे धारिष्ट केले जाते. पोलिस यंत्रणा बघत राहते, हे बरोबर नाही. कायद्याचे राज्य राहिले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकार व्यवस्थित चालवत नाहीत. जाहीर सभा, मेळावे घेताना मुद्देसूद बोलत नाहीत. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचे टाळतात. इकडून तिकडून चिठ्ठी आली की चिठ्ठीवर बोलले जाते. पुन्हा त्यांच्या कारभारावर टीका टिपणी झाली की गावाकडे दोन ते तीन दिवस येऊन राहतात.’राज्यात टीका टिपणी व मुख्यमंत्र्यांची शेती या विषयावर चर्चा होऊ लागली की मग फायलींचा निपटारा करण्यासाठी गावी गेल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगितले जाते. तीन दिवसात ६५ फायलींचा निपटारा केल्याचे जाहीर केले जाते. आम्ही १९९९ पासून सत्तेत आहोत. सत्तेची कधी मस्ती केली नाही. आम्ही दोन तासांत ६५ फायलींचा निपटारा करत होतो.’आमदार महेश शिंदे यांचा नामोल्लेख टाळत ‘२००७ मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत एक तरुण उमेदवार म्हणून त्यांना संधी देण्याचे काम केले. मात्र, संधीचे सोने करण्याऐवजी राख करण्याकडे काही जणांचा कल असतो, तसे काही घडले. येथील लोकप्रतिनिधी माझ्या आणि खासदार शरद पवार यांच्या नावाने शिव्या घालण्याचे काम करतात. शिव्या घातल्या म्हणजे सभा जिंकली, असे त्यांना वाटते. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासाठी बाजार समिती निवडणूक ही कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील परिवर्तनाची नांदी ठरणार आहे,’ असेही अजित पवार म्हणाले.शशिकांत शिंदे म्हणाले, ‘आम्ही पालकमंत्री होतो. व्यासपीठावर बसलेल्या आमदारांनी पालकमंत्रीपद भूषविले आहे. त्यांनी कधी विरोधाला विरोध केला नाही. खुनशी राजकारण केले नाही. विरोधकांच्या धनशक्तीचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतील वजीर असून, बुद्धिबळाच्या खेळामध्ये वजीर हा भल्याभल्यांना चितपट करतो. अगदी तुमच्या राजाला देखील सपशेल चेकमेट करेल.’आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांचा मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर कोरेगाव, खटाव व जावली महाबळेश्वर शेती उत्पन्न बाजार समितीसह कोरेगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ, कोरेगाव तालुका खादी ग्रामोद्योग संस्थेच्या संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तालुकाध्यक्ष भास्कर कदम यांनी स्वागत केले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी प्रास्ताविक केले.
साखर कारखानदारीवर भाष्यअजित पवार हे भलत्याच मूडमध्ये होते. त्यांनी भाषणात अनेकांच्या दांड्या गुल केल्या. जनतेला अपेक्षित कारभार करण्याच्या सूचना शशिकांत शिंदे यांना केली, तर आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांच्याविषयी म्हणाले, ‘खंडाळा आणि किसन वीर साखर कारखान्यात पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनी घाण केली होती. ती काढताना या बंधूंची दमछाक होत आहे. सहकारी संस्था व्यवस्थित चालवाव्या लागतात. दोघे भाऊ आता चांगलेच वाकले असून, खासदार शरद पवार व माझ्याकडे कारखान्याच्या विषयात येत असतात.’