सातारा : जिल्ह्यात आठवडी बाजार सुरू असल्याने गर्दी वाढत आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंगही पाळले जात नाही, तर काही विक्रेते, तसेच ग्राहकही विनामास्क असतात. त्यामुळे कोरोनाला निमंत्रणच मिळत आहे. यामुळे कोरोना रोखण्याची जबाबदारी नक्की कोणाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बाजारामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.
जिल्ह्यात मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. सुरुवातीला किरकोळ प्रमाणात कोरोनाबाधित सापडत होते. मात्र, एप्रिल महिन्यापासून १०-२०च्या संख्येने बाधित वाढत गेले. मे महिन्यानंतर रुग्णांची संख्या खऱ्याअर्थाने वाढली. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर १००-२०० च्या पटीत रुग्ण सापडले. यामुळे प्रशासनासमोर चिंता निर्माण झाली. परिणामी तालुकानिहाय कोराना सेंटर उघडली गेली. त्या ठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले, तर सप्टेंबर महिन्यापर्यंत बाधित आकडा ३८ हजारांवर गेला होता. या काळात कोरोनाचा कहर होता. जिल्ह्यात लॉकडाऊन असतानाही बाधित संख्या कमी होत नव्हती.
ऑक्टोबर महिन्यानंतर मात्र, रुग्णसंख्या हळूहळू कमी झाली. जानेवारी महिन्यापर्यंत ही संख्या कमी होती. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे कोरोना रुग्ण, तसेच मृतांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात सध्या ६३ हजारांवर बाधित झाले आहेत, तर कोरोनामुळे एक हजार ८९२ जणांचा मृत्यू झाला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. याला कारण म्हणजे आजही बाजारपेठेत गर्दी होत आहे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. अनेकजण विनामास्क वावरत आहेत.
जिल्ह्यात आजही आठवडी बाजार सुरू आहेत. अशा बाजारात अनेक गावचे लोक येतात. त्यातच गर्दी होत असल्याने कोरोनाला निमंत्रणच मिळत आहे. काही विक्रेते, तर मास्क काढून बोलत असतात. तसेच नागरिकही मास्क हनुवटीवर आणून ठेवतात. गर्दी व नियमांचे पालन होत नसल्याने कोरोना संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. याला आळा घालायचा असेल तर शासन नियमांचे पालन आवश्यक ठरले आहे. मात्र, मला काय करायचे असाच अनेकांचा पवित्रा असतो. हाच धोकादायक ठरत आहे.
चौकट :
कारवाईची खरी गरज...
साताऱ्यात तर गुरुवार आणि रविवारी बाजारात मोठी गर्दी होते. साताऱ्यासह परिसरातील गावातून नागरिक येत असतात. काही शेतकरी भाजीपाला विक्रीसाठी आणतात. त्यामुळे बाजारात गर्दी वाढत आहे. अनेक विक्रेते तर नावालाच तोंडावर मास्क ठेवतात. विना मास्क त्यांचा वावर सुरू असतो. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. तरच सातारा शहरातील बाधितांचे प्रमाण कमी होईल.
....................
अन् बाजाराची जागा बदलली...
माण तालुक्यातील एका गावात आठवडी बाजार भरतो; पण कोरोनामुळे ग्रामपंचायतीने आठवडी बाजार भरणार नसल्याचे जाहीर केले. विक्रेते, शेतकऱ्यांनाही सूचना केली. पण, शेतकरी आणि विक्रेत्यांनी नेहमीच्या ठिकाणी न बसता गावापासून जवळच बाजार भरविला. अशा घटना घडत असल्याने कोरोना दूर जाण्याऐवजी आपणच त्याच्या जवळ जात असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
कोट :
जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळे पुन्हा चिंता वाढू लागली आहे. पूर्वीप्रमाणे अनेक समस्यांना सामोरे जायचे नसेल तर नागरिकांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे तरच कोरोनाचे प्रमाण कमी होईल. तसेच प्रशासनही विविध पातळीवर उपाययोजना राबवीत आहे. पण, याला लोकांचीही साथ मिळणे आवश्यक ठरले आहे.
- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी
फोटो २५सातारा बाजार फोटो
फोटो ओळ : सातारा येथे मंडईमध्ये विनामास्क फिरणारे अनेकजण दिसून येत आहेत.
फोटो २५सातारा वाहन फोटो
फोटो ओळ : साताऱ्यातील बाजारात शेतमाल आणल्यानंतर वाहने रस्त्यावर उभी करून माल उतरविला जातो. यामुळे वाहतुकीची कोंडी होते. (छाया : नितीन काळेल)
.........................................................................