लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथील एका उसाच्या शेतात गर्भलिंग निदान चाचणी होत असलेल्या एका घराजवळ जाऊन आरोग्य विभागाने मंगळवारी पंचनामा केला. तेथील काही लोकांचे जबाब नोंदवून पुढील कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी फलटणच्या वैद्यकीय अधीक्षकांना केल्या.
फलटण येथे उसाच्या फडातच गर्भलिंग निदान चाचणी केली जात असल्याचे स्टिंग ऑपरेशन ‘लोकमत’ने सोमवारी केले. याचे सविस्तर वृत्त मंगळवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच सातारा जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. फलटणमधील वैद्यकीय अधीक्षकांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर स्वत: डाॅ. करपे आणि फलटणच्या वैद्यकीय अधीक्षकांचे पथक जिथे गर्भलिंग निदान केले जाते होते, त्या ठिकाणी पोहोचले.
यावेळी अधिकाऱ्यांनी तेथील लोकांची चाैकशी करून जबाब नोंदवले, तसेच घटनास्थळाचा पंचनामाही करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार तेथे सुरू असल्याचे अनेक लोकांचे म्हणणे आहे. मात्र, पुढे येऊन कोणीही बोलत नव्हते. ‘लोकमत’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर तेथे सुरू असणारे गैरप्रकार बऱ्याच नागरिकांनी ‘लोकमत’कडे कथन केले.
एकच चर्चा ‘ते’ डाॅक्टर कोण ?फलटण तालुक्यात बरेच डाॅक्टर आहेत. या डाॅक्टरांकडून चांगल्या प्रकारे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे. मात्र, अशा एखाद्या बोगस डाॅक्टरमुळे वैद्यकीय व्यवसायाला गालबोट लागते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर गर्भलिंग निदान करणारे ‘ते’ डाॅक्टर कोण, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे.